सर जे जे रुग्णालयातील नेत्र विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्यासह नऊ अध्यापकांनी बुधवारी राजीनामा दिला होता. राजीनामा दिलेल्यांमध्ये माजी विभागप्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांचाही सहभाग होता. निवासी डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या तक्रारीमुळे आणि गेल्या वर्षभरात रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी केलेल्या छळवणुकीमुळे राजीनामा देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. पत्रकार परिषद घेत डॉ. लहाने यांनी आपण तीस वर्ष जे जे रुग्णालयात अध्यापन आणि रुग्णसेवा केली असताना आज लागत असलेले हे चुकीचे आरोप त्यातही बाजू ऐकून न घेण्याला कंटाळून आजपासून माझा आणि जे जे चा संबंध तुटला अशी घोषणाच केली.
आज डॉ. तात्याराव लहाने यांच्या इतर सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आमची बाजू न ऐकता चौकशी पूर्ण केली आणि आम्हाला दोषी ठरवले, आरोपांमुळे आम्ही उद्विग्न झालो आहोत म्हणून राजीनामा दिले”, असं तात्याराव म्हणाले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा प्रशासनावर आरोप केले आहेत.
काय म्हणाले तात्याराव लहाने?
ज्येष्ठ डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, आमची बाजू न ऐकता चौकशी पूर्ण केली आणि आम्हाला दोषी ठरवले. सहा महिन्यांपूर्वी काही निवासी डॉक्टर रुजू झाले, रुग्ण तपासणे आणि त्यांचा इतिहास लिहिणे हा अभ्यासक्रमाचा भाग आहे. निवासी डॉक्टरांना स्टायपंड काम करण्यासाठी दिले जाते. विद्यार्थ्यांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया शिकविल्या आहेत, ते समाधानी असल्याचे निवासी डॉक्टरांनी लिहून दिले आहे. लेक्चर किती झाले, नोट्स दिल्या याच्या नोंदी आहेत. त्यातच दोन जागा रिक्त आहेत, या जागा भराव्यात याबाबत आम्ही पत्र लिहीले आहे, असं लहाने म्हणाले. जे जे रुग्णालय केवळ शिकवण्यासाठी नाही तर सेवेसाठी आहे, लांबून छोट्या छोट्या खेडेगावातून येणाऱ्या रुग्णाला सेवा देणे गरजेचे आहे. आमचे सर्वांचे राजीनामे ३१ तारखेला संध्याकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी व्यवस्थित फॉरमॅटमध्ये दिले आहे. आता राहिलेली प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करणार आहे. मी मुंबईत तीस आणि आंबेजोगाई इथे ६० पिढ्या घडवल्या आहेत. एवढे शिकवल्यावर असे कोणी बोलत असेल तर माझं उद्विग्न होण साहाजिकच आहे, असं लहाने यांनी सांगितले. मी विक्रमासाठी नाही तर सेवा म्हणून शस्त्रक्रिया करत आहे. आम्ही निवासी डॉक्टरांना दोषी ठरवणार नाही, त्यांना आम्ही माफ केलं आहे.
(हेही वाचा JJ Hospital : जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संपासंदर्भात सर्वमान्य तोडगा काढा – अजित पवार)
अधिष्ठाता मानसिक त्रास देत असल्याची तक्रार
जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता आपल्याला वर्षभरापासून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार राजीनामे देणाऱ्या सर्व वरिष्ठ डॉक्टरांची आहे. जे जे रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टरांनी एक प्रसिद्ध पत्रक जारी करत राजीनामा देण्यामागील कारण सांगितलं होतं. राजीनामा देणाऱ्या लहाने आणि इतर आठ डॉक्टरांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून त्यात संपूर्ण घटनाक्रम लिहिला आहे. सेवानिवृत्तीनंतरही काम करणाऱ्या तात्याराव लहाने यांचे वेतन अधिष्ठातांनी अदा केले नसून लहाने यांना शासकीय निवासस्थान रिक्त करायला सांगून सात लाख रुपये दंड ठोठावला, असं पत्रकात म्हटलं आहे. निवासी डॉक्टरांना आमच्याविरोधात भडकावलं जात असून त्यांना भडकवण्यात जे जे च्या अधिष्ठाता सहभागी असल्याचं तात्याराव लहाने यांनी म्हटलंय.
Join Our WhatsApp Community