नालेसफाईच्या कामाला AI प्रणालीच्या देखरेखीखाली सुरुवात

574
मुंबई, विशेष प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिकेतर्फे (BMC) छोट्या व मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी मागवलेल्या निविदांची छाननी पूर्ण होवून शहर आणि उपनगरांसाठी एकूण २३ कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. मंगळवारी २५ मार्च २०२५ पासून गाळ काढण्याच्या कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे. तर, मिठी नदीतील (Mithi River) गाळ काढण्याचे कार्यादेश येत्या आठवड्यात देण्यात येणार असून लागलीच गाळ काढण्याची कार्यवाही सुरू केली जाईल.

 

दरम्यान, नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांसाठी प्रशासनाने छायाचित्रण समवेत ३० सेकंदाचे चित्रीकरण (व्हिडिओ) बंधनकारक केले आहे. तर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सर्व चित्रीकरणांचे अर्थात व्हिडिओंचे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या आधारे विश्लेषण करण्यात येणार आहे. एकूणच, नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांमध्ये अधिकाधिक पारदर्शकता या निमित्ताने येणार आहे.

(हेही वाचा – Sanatan Prabhat : ‘सनातन प्रभात’ नेहमीच काळाच्या पुढे राहिले आहे ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर)

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांमधील गाळ काढते, तर लहान नाल्यांमधील गाळ काढण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयांवर (वॉर्ड) असते. नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा जलद होतो. प्रत्येक वर्षी नाल्यांमधून किती गाळ काढणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून उद्दिष्ट निश्चित केले जाते.

दरवर्षी नाल्यांमध्ये साचणारा गाळ हा वर्षभरात तीन टप्प्यांमध्ये काढला जातो. त्यात प्रामुख्याने पावसाळ्यापूर्वी सर्वाधिक गाळ उपसा केला जातो. या प्रचलित पद्धतीनुसार, यावर्षी एप्रिल व मे २०२५ या दोन महिन्यांत नाल्यांमधील एकूण गाळाच्या ८० टक्के गाळ काढण्यात येईल, तर पावसाळ्यादरम्यान १० टक्के आणि पावसाळ्यानंतर उर्वरित १० टक्के गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे काम सुयोग्य नियोजन आखून आणि जास्तीत जास्त पारदर्शकतेने करण्यासाठी महानगरपालिकेने उपाययोजना केल्या आहेत.

(हेही वाचा – भारतीय वंशाचे Pradeep Patel आणि त्यांच्या मुलीची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या)

नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश देण्यात आले आहेत. लहान नाल्यांमधून गाळ उपसा करण्याचे कार्यादेश दिनांक १९ मार्च २०२५ रोजी देण्यात आले आहेत. तर, मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याचे कार्यादेश दिनांक २२ मार्च २०२५ रोजी देण्यात आले आहेत. त्यानुसार, मंगळवार, २५ मार्च २०२५ पासून गाळ काढण्याची कामे सुरू होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नाल्यांमधून गाळ उपसा करण्यापूर्वी आणि गाळ उपसा केल्यानंतरची छायाचित्रे सादर करणे बंधनकारक तर आहेच. त्यापुढे जाऊन आता प्रत्येक कामासाठी ३० सेकंदांचे चित्रीकरण सादर करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. लहान नाल्यांच्या बाबतीत गाळ काढण्यापूर्वीचे आणि गाळ काढल्यानंतरचे सीसीटीव्ही द्वारे चित्रीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लहान नाल्याच्या उगमापासून पातमुखापर्यंत (एन्ड टू एन्ड) हे चित्रीकरण करावयाचे आहे. मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ उपसा केलेल्या कामांच्या या सर्व चित्रफिती कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) प्रणालीचा वापर करून तपासण्यात येणार आहेत.

कामाच्या तीन टप्प्यांत – (१) काम सुरू होण्यापूर्वी, (२) प्रत्यक्ष काम सुरू असताना आणि (३) काम पूर्ण झाल्यानंतर—दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअलटाइम जिओ-टॅग) यासह चित्रफीत आणि छायाचित्रे तयार करून ती संबंधित सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना अनिवार्य असेल.

(हेही वाचा – Bangladeshi Infiltrators : बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला अटक)

त्याचप्रमाणे, दररोज नाल्यांमधून काढलेला गाळ ठेवण्याची जागा, गाळ भरण्यापूर्वी रिकामा असलेला डंपर, डंपरमध्ये गाळ भरल्यानंतरचे दृश्य, गाळ भरलेले वाहन क्षेपणभूमीवर जाण्यापूर्वी वजन काट्यावर केलेल्या वजनाची कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय म्हणजेच फेरफार करायला वाव न देता थेट प्रणाली (Software) मध्ये होणारी नोंद, गाळ वाहून नेल्यानंतर क्षेपणभूमीवर पोहोचलेल्या वाहनांची माहिती, त्या वाहनांचे क्रमांक आणि वेळ यांची नोंद करणे आवश्यक असेल. समवेत, क्षेपणभूमीवर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारली जाणार आहे.

गाळ उपसा संदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व व्हिडिओंचे महानगरपालिका प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जाईल. यंदा प्रथमच अशा प्रकारचा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली वापराचा प्रयोग होणार आहे. त्यातून नाल्यांमधून गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होणार आहे. तसेच, गाळ काढण्याच्या संपूर्ण कालावधीत प्रत्यक्ष कार्यस्थळी अभियंत्यांची उपस्थिती अनिवार्य आहे.

मुंबई महानगरातील नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे ठरवलेल्या वेळेत पूर्ण करावीत, आवश्यक तेथे अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री नेमून कामांना गती द्यावी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कामांची पारदर्शकता आणि गुणवत्ता तपासावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी यंत्रणेला दिले आहेत. एकूणच, महानगरपालिका प्रशासनाला ठाम विश्वास आहे की, आखलेल्या नियोजनानुसार शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या सर्व विभागांतील नाल्यांमधून गाळ उपसा कामे विहित मुदतीत आणि पारदर्शकरित्या पूर्ण केली जातील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.