मुंबईतील मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रभावामुळे नागरिक चिंतेत असले तरी त्यांच्या सवयीत झालेल्या बदलांमुळे यंदा मोठा फरक नालेसफाईच्या कामांमध्ये दिसून येत आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा नाल्यातून काढण्यात येणारा गाळ हा चक्क निम्म्यांवर आला आहे. यंदा मोठे व लहान नाले मिळून एकूण २ लाख ५१ हजार ६१० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
दरवर्षी ठरवण्यात येते उद्धिष्ट
नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी मदत मिळते. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करताना नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करुन दरवर्षी नाल्यांमधून गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, हे उद्दिष्ट ठरविले जाते. यंदा मोठे व लहान नाले मिळून एकूण २ लाख ५१ हजार ६१० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यामध्ये शहर विभागात ३० हजार १४२ मेट्रिक टन, पूर्व उपनगरांमध्ये ७३ हजार ४४३ मेट्रिक टन तर पश्चिम उपनगरांमध्ये १ लाख ४८ हजार ०२५ मेट्रिक टन गाळ काढण्यात येणार आहे. या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे, असा दावा अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी केला आहे.
तरीही नालेसफाईला सुरुवात नाहीच
दोन वर्षांपूर्वी म्हणजे सन २०२० मध्ये मुंबईत नदी-नाल्यांमधून एकूण ५ लाख ०४ हजार १२५ मेट्रिक टन गाळ उपसण्यात आला होता. तर मागील वर्षी २०२१ मध्ये त्या आधीच्या वर्षीतील उपसण्यात आलेल्या गाळाच्या तुलनेत सुमारे ३५ टक्के वाढ करुन ६ लाख ८५ हजार ३५८ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी १५ एप्रिलपर्यंत या उद्दिष्टापैकी १ लाख ८३ हजार ७१६ मेट्रिक टन म्हणजे सुमारे ३५ टक्के गाळ काढण्यात आला होता आणि त्यानंतर एकूण १०७ टक्के नालेसफाई केल्याचा दावा प्रशासनाने केला होता. परंतु एप्रिलचा पहिला आठवडा सुरु झाला तरी नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली नाही.
पावसाळ्यापूर्वी 75 टक्के काम पूर्ण
मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरु करण्यात आल्याचा दावा करत अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण २ लाख ५१ हजार ६१० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यंदाही कामे सुरु झाली असून पावसाळ्यापूर्वी म्हणजे दिनांक ३१ मे २०२२ रोजीच्या विहित मुदतीत ही कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. पावसाळ्यापूर्वी ३१ मे पर्यंत एकूण नालेसफाईच्या कामाच्या ७५ टक्के काम पूर्ण केले जाते. त्यामुळे मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा नाल्यातील गाळ कमी काढण्याचे उद्दिष्टय ठेवण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
म्हणून यंदा गाळाचे प्रमाण कमी
नालेसफाईचे काम दरवर्षी केले जात असल्याने गाळाचे प्रमाण वाढण्याऐवजी ते कमी व्हायला हवे. परंतु मागील अनेक वर्षांपासून गाळ काढण्याचे उद्दिष्ट्य जास्त ठेवले जात आहे. परंतु यंदा प्रथमच गाळाचे उद्दिष्टय कमी ठेवण्यात आले असून कोरोना काळात नागरिक घरीच असल्याने नाल्यांमध्ये कचरा फेकला गेला नाही, ज्यामुळे हे गाळाचे प्रमाण कमी झाले की दरवर्षी योग्यप्रकारे गाळ काढला जात असल्याने यंदा कमी गाळ काढण्यात येत आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
( हेही वाचा: जुहूतील हा भाग पुराच्या पाण्यातून होणार शापमुक्त! )
सन २०२२मधील नालेसफाईवरील खर्च
- मोठ्या व लहान नाल्यांमधील गाळ काढण्याचा एकूण खर्च : १६२ कोटी रुपये
- मोठ्या नाल्यांवरील खर्च : एकूण ६ निविदा मंजूर, मूल्य सुमारे ७१ कोटी रुपये
- छोट्या नाल्यांवरील खर्च : एकूण १७ निविदा मंजूर, मूल्य सुमारे ९१ कोटी रुपये
मुंबईतील नदी-नाल्यांमधून मागील दोन वर्षांमधील काढलेला गाळ
- सन २०२० : एकूण ५ लाख ०४ हजार १२५ मेट्रिक टन
- सन २०२१ : एकूण ६ लाख ८५ हजार ३५८ मेट्रिक टन
- सन २०२० : एकूण २ लाख ५१ हजार ६१० मेट्रिक टन