ड्रीम्स मॉल आग प्रकरणी ‘या’ मुद्द्यांवर होणार चौकशी !

ही चौकशी करण्यासाठी, मुंबई अग्निशमन दलात कामकाजाचा अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असलेले विद्यमान उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भांडुप येथे ड्रीम्स मॉल व त्यात तिस-या मजल्यावरील सनराईज रुग्णालयामध्ये आग लागून मोठी दुर्घटना घडली. या आगीच्या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल  यांनी उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे यांना पुढील पंधरा दिवसात सर्वंकष चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ही चौकशी करण्यासाठी, मुंबई अग्निशमन दलात कामकाजाचा अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असलेले विद्यमान उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे ह्यांची नियुक्ती!

  • ड्रीम्स मॉल घटनेतील आगीचे नेमके कारण काय, त्याबाबत प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्यासोबत सल्लामसलत करून कारणांची स्पष्टता करणे.
  • मॉल तसेच त्यातील सनराईज रुग्णालयाला आवश्यक त्या सर्व परवानगी/अनुज्ञप्ती (licence) देण्यात आल्या होत्या का, त्याची पडताळणी करून, दिलेल्या नसल्याचे आढळल्यास संबंधीत अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे.
  • अग्निसुरक्षा पालनाबाबतच्या उपाययोजना करण्यात मॉलचे मालक/व्यवस्थापन तसेच रुग्णालयाचे मालक/व्यवस्थापन ह्यांच्याकडून काही त्रुटी राहिल्या होत्या का, ते शोधून काढणे.
  • अग्निशमन कार्यात काही त्रुटी होत्या का, त्याची कारणे शोधून काढणे.
  • या घटनेच्या अनुषंगाने, इतर काही संदर्भित मुद्दे असल्यास ते आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये म्हणून योग्य त्या शिफारशी सुचवणे.

(हेही वाचा : कोरोनाचा सत्र न्यायालयाच्या कामकाजावर असा झाला परिणाम!)

दहा जणांचा मृत्यू

भांडूप येथील ड्रिम्स मॉलला काल आग लागली होती. या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला होता. मॉलमध्ये कोविड रुग्णालयही होते. त्यामुळे या आगीत रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यूही झाला होता. आगीत संपूर्ण मॉल जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश देतानाच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्याचं जाहीर केले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here