Dress Code : अष्टविनायकांपैकी ३ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू

आपली उपस्थिती आणि वर्तन मंदिराच्या शुद्धतेला अनुसरून असावे यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.

84

अष्टविनायकांपैकी मोरेगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी व सिद्धटेकच्या सिद्धिविनायकासह इतर 2 गणपती मंदिरांसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टने वस्त्रसंहिता (Dress Code) जारी केली आहे. या संहितेनुसार, या गणपतींच्या दर्शनासाठी येणाऱ्या पुरुष भाविकांना सभ्य पोशाख परिधान करावा लागणार आहे. तर महिलांनाही पारंपरिक पोशाख किंवा मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असणारे आदरयुक्त वस्त्र परिधान करावे लागणार आहेत.

चिंचवड देवस्थान ट्रस्टकडे मोरेगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी व सिद्धटेकच्या सिद्धिविनायक या अष्टविनायकांपैकी 3 मंदिरांसह चिंचवडचा मोरया गोसावी संजीवन मंदिर व खार नारंगी मंदिराचे नियंत्रण आहे. त्यानुसार, या ट्रस्टने या पाचही गणपती मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू करत भाविकांसाठी पोशाख नियमावली (Dress Code) जारी केली आहे. ट्रस्टने ही नियमावली म्हणजे सक्ती नसून, आम्ही भाविकांना मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनाला न येण्याची विनंती आहे, असे स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा ज्येष्ठ वकील विष्णू शंकर जैन Waqf Act 1995 ला देणार आव्हान; मागील ७० वर्षांत वक्फ बोर्डाने हडपलेल्या जमिनीही उघडकीस येणार?)

ट्रस्टने काय म्हटले? 

ट्रस्टने आपल्या पत्रात म्हटले की, संपूर्ण श्रद्धा व भक्तीभावाने महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे व श्री मंगलमूर्ती वाडा येथे दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने विनम्र विनंती करण्यात येत आहे. महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे व श्री मंगलमूर्ती वाडा या केवळ वास्तू नसून, ते संस्कृती आणि भक्तीचा केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताने मंदिराच्या पवित्रतेचा आदर राखावा. भक्तीपर वातावरण टिकवण्यासाठी सहकार्य करावे. आपली उपस्थिती आणि वर्तन मंदिराच्या शुद्धतेला अनुसरून असावे यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. (Dress Code)

कोणते कपडे घालावीत?

पुरुषांनी शर्ट, टी-शर्ट आणि पूर्ण पँट किंवा धोतर, कुर्ता पायजमा घालावा. महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा. मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे. कुणीही अतिआधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीव्हलेस, फाटके, शरीरप्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये. (Dress Code)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.