‘ड्राईव्ह इन’ लसीकरणाच्या उद्घाटनात महापौर ‘आऊट’!

ड्राईव्ह इन कोरोना लसीकरण केंद्रात पहिल्या दिवशी ३३० व्यक्तींचे लसीकरण पार पडले. २१० वाहनांमधून या व्यक्ती लसीकरणासाठी आल्या होत्या.

देशातील पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राची उभारणी मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. दादर पश्चिम येथील कोहिनूर स्क्वेअरमधील वाहनतळाच्या जागेत उभारण्यात आलेल्या या लसीकरण केंद्राचे उद्घाटन शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्याहस्ते पार पडले. मात्र, एरव्ही मुंबईतील कुठल्याही लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाला प्रसिध्दी माध्यमांना सोबत घेत हजेरी लावणाऱ्या महापौरांनाच शिवसेनेने बाजुला सारले आणि सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी आपल्या विभागातील या कार्यक्रमात महापौरांना लूडबूड करण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे देशातील पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरणाच्या उद्घाटनात महापौरांची अनुपस्थिती ही शिवसेनेतील अंतर्गत कुरघोडीचाच प्रकार असल्याचे बोलले जात आहे.


दिव्यांग नागरिक आणि वरिष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचून लस घेणे जिकीरीचे ठरत आहे. यावर उपाय म्हणून पालिकेच्या वतीने ड्राईव्ह इन कोरोना लसीकरण केंद्राची संकल्पना मांडण्यात आली. त्यामुळे दादरमधील कोहिनूर स्क्वेअरमधील वाहतळाच्या जागेत हे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्याहस्ते याचे उद्घाटन करून लसीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी विभागप्रमुख, आमदार सदा सरवणकर, महापालिकेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थानिक नगरसेविका प्रिती प्रकाश पाटणकर, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर आदी मान्यवर उपस्थित होते.


दिव्यांग आणि वरिष्ठ नागरिकांना सहजतेने लसीकरण करता यावे, यासाठी ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अशाचप्रकारे मुंबईतील विविध ठिकाणी मोठ्या पार्किंग लॉटमध्ये अशीच सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
– राहुल शेवाळे, शिवसेना खासदार, दक्षिण मध्य मुंबई

पहिल्या दिवशी ३३० जणांचे लसीकरण!

या केंद्रात दिवसाला सुमारे २५० गाड्यांमधील नागरिक लस घेऊ शकतील. आता याठिकाणी केवळ ४५ वर्षांवरील आणि दिव्यांग नागरिकांसाठीच ही सुविधा उपलब्ध असून लवकरच १८ वर्षांवरील सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा मानस आहे. कोहिनूर पार्किंग लॉटमधील या केंद्रात ड्राईव्ह इन लसीकरण सुविधे व्यतिरिक्त असलेल्या ७ बूथच्या माध्यमातून दिवसाला ४ हजार नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी ३३० व्यक्तींचे लसीकरण पार पडले. २१० वाहनांमधून या व्यक्ती लसीकरणासाठी आल्या होत्या.

(हेही वाचा : पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल!)

महापौरांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला!


मागील काही दिवसांपासून मुंबईतील लसीकरण केंद्रांचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते केले जात आहे. मात्र, देशातील पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरणाच्या उद्घाटनात महापौरांना चक्क शिवसेनेनेच बाजुला ठेवले. त्यामुळे महापौरांची अनुपस्थिती ही चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे स्काऊड अँड गाईड येथील हिंदुजा रुग्णालयाच्या मदतीने बनवण्यात येणारे कोविड आरोग्य केंद्राच्या पाहणीदरम्यान स्थानिक आमदार व विभागप्रमुख सदा सरवणकर यांना बाजुला ठेवण्यात आले होते. त्यानंतर या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राच्या पूर्व तयारीची पाहणी सोमवारी जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासोबत सभागृहनेत्या विशाखा राऊत, स्थानिक शिवसेना नगरसेविका प्रिती पाटणकर, माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर, शाखा प्रमुख अजित कदम, उपविभाग प्रमुख आदींसह पाहणी केली. परंतु या दोन्ही पाहणीमध्ये आमदार सदा सरवणकर कुठेच दिसले नव्हते. परंतु उद्घाटनाच्या दिवशी मात्र सदा सरवणकर यांची आठवण शिवसेनेला झाली. सदा सरवणकर यांना आमदार म्हणून नव्हे तर विभागप्रमुख म्हणूनच बोलावल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here