विरार पूर्वेकडील महामार्गावरील खानिवडे उड्डाणपुलावर गुरुवारी, सकाळी १० वाजता भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात ट्रक आणि चारचाकी वाहनाची जोरदार धडक होऊन चारचाकी चालकाचा जागीचा मृत्यू झाला आहे. चारचाकी गाडीचा टायर फुटल्यामुळे गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
माहितीनुसार, गुरुवारी सकाळी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून चारचाकी स्कॉर्पिओ भरधाव वेगाने गुजरातच्या दिशेने जात होती. त्यावेळी अचानक गाडीचा पुढील टायर फुटल्यामुळे चालकाकडून गाडी अनियंत्रित झाली आणि समोरून येणाऱ्या आयवा ट्रकला धडली. यामुळे आयवा ट्रक जागीच उलटला. गाडी आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्यामुळे संपूर्ण गाडी चेपली आहे. तसेच चालकाचाही जागीचा मृत्यू झाला आहे.
या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. हा घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि मांडवी पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. आणि अपघातग्रस्त ट्रक आणि गाडी क्रेन साहाय्याने बाजूला केली. त्यामुळे आता महामार्गावरील वाहतूक सुरळीतरित्या सुरू आहे.
(हेही वाचा – परशुराम घाटात दरड रस्त्यावर; मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प)