मुंबई महानगर परिसरात फिरणा-या बिबट्यावर आता ड्रोनची नजर

121

मुंबई महानगर परिसरात बिबट्याचे नागरी वस्तीत शिरण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. नागरी वसाहतीत शिरलेल्या बिबट्याला पकडणे वनाधिका-यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. दाटीवाटीच्या लोकसंख्येत शिरणा-या बिबट्याला पकडण्यासाठी आता ड्रोनची मदत घेण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राणी बचाव पथकाकडे लवकरच ड्रोनच्या माध्यमातून बिबटे पकडता येतील, अशी माहिती उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक जी. मल्लिकार्जून यांनी दिली. बिबट्या पकडताना वनाधिका-यांवर हल्ला होऊ नये म्हणून बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठीही ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.

जीवितहानी टाळता येईल

नोव्हेंबर महिन्यात कल्याण परिसरातील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडताना वन्यप्राणी बचाव पथकाच्या सदस्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वन्यप्राणी बचाव पथकातील सदस्य थोडक्यात बचावला. दाटीवटीच्या वस्तीत बिबट्या शिरल्यानंतर त्याला शोधताना वनाधिका-यांच्या जीवावर बेतले असेल तर तंत्रज्ञानाच्या मदतीने बिबट्या इमारतीतील कोणत्या कोप-यात शिरला आहे हे नेमके शोधता येईल, जिवीतहानीदेखील टाळता येईल, असे मल्लिकार्जून म्हणाले. ही संकल्पना वरिष्ठ पातळीवरही सकारात्मक बाजूने मांडली गेली आहे. याबाबत ड्रोनच्या खरेदीबाबत निर्णय व्हायचा आहे, असेही मल्लिकार्जून म्हणाले.

(हेही वाचा पाकिस्तानचा खोडसाळपणा; हिंदूंना हिंसक दाखवून बदनाम करणारी वेब सिरीज; ट्रेलरनंतर संतापाची लाट)

बेशुद्ध करणे फारच आव्हानात्मक ठरेल

वन्यप्राण्याला नागरी वसाहतीत शोधण्यासाठी ड्रोन वापरल्यास वेळेचा सदुपयोग होईल. मात्र प्राण्याला बेशुद्ध कऱण्यासाठी बंदूकीत भरलेल्या इंजेक्शनचा नेम चुकल्यास जीवावरही बेतू शकते, असाही मुद्दा वन्यजीव अभ्यासकांनी उपस्थित केला. देशात ड्रोनच्या मदतीने प्राण्याला बेशुद्ध करण्याची पद्धत कधीही वापरली गेलेली नाही. प्राण्यांच्या स्नायूंऐवजी चुकून डोळ्याला लागल्यास अपघात होऊ शकतो. राज्यात जंगलात मोकळ्या ठिकाणी ड्रोनच्या मदतीने प्राण्यांवर हालचाल ठेवता येते. आफ्रिकेतही ड्रोनच्या वापराने प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते. मात्र नागरी वसाहतीत बिबट्याचा ठावठिकाणा शोधून बेशुद्ध करणे फारच आव्हानात्मक ठरेल, अशी भीती वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली.

वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जातेय

राज्यात माणून-वन्यप्राणी संघर्ष वाढलेल्या भागांत वनविभागाने आता ड्रोनचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेल्या हत्तींच्या कळपावर देखरेख ठेवण्यासाठी पुण्यातील रेस्क्यू ही खासगी प्राणीप्रेमी संस्था थर्मल ड्रोनच वापरुन वनविभागाला साहाय्य करत आहे. हत्तींचा कळप गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत फिरतो. तेरा माणसांवर हल्ला करणा-या सिटी१ या गडचिरोलीतील वाघाला पकडण्यासाठीही थर्मल ड्रोनचा वापर करण्यात आला होता. विदर्भ वगळता राज्यात मुंबई महानगर परिसरात आता वनविभाग ड्रोन वापरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.