ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे याला पुणे पोलिसांच्या विशेष आणि गुन्हे शाखेच्या पथकाने नेपाळ सीमेलगत बाराबंकी मंगळवारी अटक केली. या दोन्ही आरोपींना घेऊन पोलिसांचे पथक पुण्याकडे रवाना झाले आहे.
या कारवाईमुळे ललित पाटीलचा ठावठिकाणा समजण्याची शक्यता वाढली आहे. या दोन्ही आरोपींना आज, बुधवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे. ससून रुग्णालयातून अमली पदार्थ विक्री करणारा तस्कर ललित पाटील याचा साथीदार सुभाष मंडल (२९, रा, देहू रोड, मूळ रा. झारखंड) आणि ससून रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगार रौफ रहीम शेख (१९, रा. ताडीवाला रस्ता) यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली. पाटीलला रुग्णालयात दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन देण्यासाठी आलेल्या मंडल आणि शेख यांना पोलिसांनी बेड्या घातल्या. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेणारा ललित पाटील बंदोबस्तावरील पोलिसांना चकवा देऊन पसार झाला.
(हेही वाचा – India vs Afghanistan : भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात विराट आणि नवीन उल हकमधील द्वंद्वावर सगळ्यांचं लक्ष )
मुंबई पोलिसांच्या पथकाने नाशिक परिसरात छापे टाकून ललितचा भाऊ भूषण याचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत तीनशे कोटींचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. या वेळी भूषण पसार झाला. भूषण उत्तर प्रदेशातील बाराबंकी, गोरखपूर रस्ता या भागात नेपाळ सीमेजवळ असल्याची माहिती तांत्रिक तपासात मिळाल्यानंतर पुणे पोलिसांचे विशेष पथक तेथे रवाना झाले. एका लॉजमधून दोघांना ताब्यात घेण्यात आले. हे दोघेही नेपाळला जाण्याची शक्यता होती. बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिस त्यांचा शोध घेत होते.
मुख्य आरोपी ललितला दोन वर्षांपूर्वी चाकण परिसरात पकडण्यात आले. त्याच्याकडून २० किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. जून २०२३मध्ये तो आजारपणाचा बहाणा करून कारागृहातून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता.
ललित पाटीलचा लवकरचा पर्दाफाश होण्याची शक्यता…
ललित आणि भूषण नाशिक परिसरातील शिंदे गावातील कारखान्यात मेफेड्रोन तयार करीत होते. भूषण इंजिनीअर आहे. त्याने ‘एमडी’साठीचे प्रशिक्षण घेतले होते. भूषणला अटक केल्यानंतर तपासात अनेक महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता आहे. त्याचा भाऊ ललित लवकरच पकडला जाईल, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.