मुंबईच्या मोहम्मद अली रोड येथे कपडे विकणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर चौकशीत धक्कादायक अशी बाब समोर आली आहे. दिवसा कपडे विकून स्वतःला कापड व्यापारी सांगणारा हा पट्ट्या कापड विक्रीच्या आड रात्री अमली पदार्थाची विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केलेल्या या नायजेरियन नागरिकाकडून ३.९० कोटी रुपयांचा कोकेन हा अमली पदार्थ जप्त केला आहे.
आरोपी पामबीच रोड येथे उच्चभ्रू सोसायटीत राहायचा!
इनोसेंट लॉरेन्स दादा (३२) नावात इनोसेंट असणारा हा लॉरेन्स दादा नवी मुंबईतील पामबीच रोड वाशी येथे एका उच्चभ्रू सोसायटीत राहण्यास होता. २०१६ मध्ये भारतात आलेला इनोसेंट लॉरेन्स दादा याने दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोड येथे कपड्याचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र त्याचा खरा व्यवसाय हा अमली पदार्थ विक्रीचा होता. दिवसा कापड व्यापारी म्हणून मिरवणारा लॉरेन्स याचे मात्र रात्री अंधारात काळे धंदे होते. रात्री तो कोकेन या महागड्या ड्रग्सची विक्री करून दिवसाला लाखो रुपयांची कमाई करीत होता.
(हेही वाचा : नारायण राणेंचे आता सिंधुदुर्गात धुमशान!)
१ किलो ३०० ग्राम कोकेन हा अमली पदार्थ जप्त
त्याच्या या काळ्या धंद्याची माहिती मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाचे वांद्रे युनिटचे पोलिस कॉन्स्टेबल मांढरे यांना मिळाली होती. पश्चिम उपनगरातील खार येथे नायजेरियन इनोसेंट लॉरेन्स दादा हा ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच वांद्रे युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सुशांत बंडगर, सुरेश भोये, पो.उनि. शंकर पवळे, पोलिस कॉन्स्टेबल मांढरे, सौदाने, खारे, केंन्द्रे, राठोड अदी पथकाने खार परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन वांद्रे युनिट येथे आणण्यात आले. त्याच्याजवळ असणाऱ्या बॅगेतून १ किलो ३०० ग्राम कोकेन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या कोकेन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ३ कोटी ९० लाख रुपये किंमत असून इनोसेंट लॉरेन्स दादा हा दिवसा मोहम्मद अली रोडवर कपडे विक्री करायचा आणि रात्री मात्र पश्चिम उनगरात उच्चभ्रू सोसायटीमध्ये तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ड्रग्सची विक्री करायचा अशी माहिती चौकशीत समोर आली.
Join Our WhatsApp Community