Drunk and Drive : कठोर कारवाईच लावेल अपघातांना ब्रेक!

वरळीच्या घटनेमध्ये मिहीर शहाने गाडी थांबवून त्या जखमी बाईची मदत केली असती तर, तिचे प्राण वाचू शकले असते. परंतु यामध्ये होते असे की, जो ड्रायव्हर स्वतःच दारूच्या नशेत असतो त्याला आपण मदत करावी याचेसुद्धा भान राहत नाही.

100

मुंबई, पुणे आणि नागपूर, ड्रंक अँड ड्राईव्ह (Drunk and Drive) प्रकरणांची मालिका सुरूच आहे. पुण्यातील बहुचर्चित कल्याणीनगर कार अपघात प्रकरणाने देशात एकच संताप उसळला होता. आरोपीला वाचविण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्याचे सुरुवातीला दिसून आले होते. जनक्षोभ वाढताच त्याच यंत्रणांचा सूर आणि नूर पालटला. त्यानंतर रविवारी, ७ जुलै रोजी मुंबईतील वरळी येथे शिवसेना पालघरचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहाने बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली. यात महिलेचा मृत्यू झाला. या प्रकारांमुळे स्त्यावरून चालायचीसुद्धा भीती वाटू लागली आहे, अशाच प्रतिक्रिया सध्या नागरिकांनी देण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी पोलिस महासंचालक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रविण दीक्षित  यांची विशेष मुलाखत…

प्रश्न : ड्रंक आणि ड्राईव्हच्या घटनांचे वाढते प्रमाण बघता कायदा अजून कठोर करायला हवा का?

उत्तर : ‘नॅशनल क्राईम रेकॅार्ड ब्युरो’चा रेकॅार्ड बघितला तर, भारतामध्ये दरवर्षी दीड लाख लोकांचा मृत्यू हा रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमुळे होतो. तर जवळजवळ साडेचार ते पाच लाख लोक हे अपघातामुळे जखमी होतात. त्यामुळे ही प्रकरणे आत्ताच वाढली आहेत असे म्हणता येणार नाही. ड्रंक आणि ड्रायव्हच्या (Drunk and Drive) केसेसमध्ये नियम हे कठोर आहेतच, नवीन कायद्यांमध्ये बदलही झालेले आहेत. भारतीय न्यायसंहिता कायद्यानुसार या अपघातांच्या प्रकरणांमध्ये एक विशिष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. जर, कार चालकाकडून अपघात झाल्यानंतर जखमींना जवळच्या रूग्णालयात नेलं आणि उपचारास मदत केली तर एका वर्षापर्यंतची शिक्षा प्रस्तावित आहे. मात्र, असे न करता कारचालक तिथून फरार झाला तर यासाठी १० वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंड सुचवण्यात आलेला आहे. एप्रिल २०२४ मध्ये ट्रक ड्रायव्हर्स असोसिएशनने या तरतूदींना विरोध केला होता. या तरतूदी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. यामुळे शासनाने हा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवलेला आहे.

(हेही वाचा सर्वोच्च न्यायालय म्हणाले, घटस्फोटीत Muslim महिलेला पोटगी द्या; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा नकार म्हणते, आम्ही शरियत कायदे मानतो)

प्रश्न : अपघाताच्या या वाढत्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत?

उत्तर : वरळीच्या घटनेमध्ये मिहीर शहाने गाडी थांबवून त्या जखमी बाईची मदत केली असती तर, तिचे प्राण वाचू शकले असते. परंतु यामध्ये होते असे की, जो ड्रायव्हर स्वतःच दारूच्या नशेत असतो त्याला आपण मदत करावी याचेसुद्धा भान राहत नाही. त्यामुळे दारु पिऊन गाडी चालवणे हा जो प्रकार आहे, त्याच्याविरुद्ध उपाययोजना केल्या पाहिजेत. रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पब्सवर कारवाई करणे, अवैध दारूची विक्री सुरू आहे तिथे उत्पादन शुल्क विभागाने कडक कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले पाहिजेत. पोलिसांनी देखील अशा ठिकाणी जाऊन कारवाई केली पाहिजे.

प्रश्न :  भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर कसे नियंत्रण ठेवायचे?

उत्तर : हायवेवर स्पीड गन सारख्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तसेच अंतर्गत शहरांच्या रस्त्यांवर स्पीड गन लावून उपाययोजना करू शकत नाहीत.  परंतु ठिकठिकाणी रात्रीच्या वेळेस नाकाबंदी करुन तपासणी केली जाऊ शकते. अपघात टाळणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन ट्राफिक पोलिस, पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाया वाढवल्या पाहिजेत. मी स्वतः पोलिस आयुक्त असताना अशा प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाया करत असे. त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मृत्यूदर कमी झाला होता. मात्र ड्रंक आणि ड्रायव्ह (Drunk and Drive) केसमध्ये नाकाबंदी केली असेल तर चालक पोलिसांच्या अंगावर देखील गाडी घालतात आणि त्यातही काही पोलिसांचा मृत्यू झालेला आहे. हे लक्षात घेऊन पोलिसांनी पूर्ण काळजी घेणे गरजेचे आहे.

नागरिकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे?

रस्त्यावर चालताना मध्येच रस्ता ओलांडणे, रस्त्याच्या मधोमध चालणे हे नागरिकांनी टाळावे. सिग्नल, झेब्रा क्रॅासिंग पाहुन रस्ता ओलांडावा. बऱ्याचदा फोनवर बोलत असताना आपले भान राहत नाही आणि असे अनुचित प्रकार घडतात.
प्रत्येक रस्त्याला फुटपाथ असणे हे सरकारने अत्यावश्क करणे गरजेचे आहे. हे फुटपाथ पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळे ठेवणे आवश्यक आहे.
दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे अतिशय आवश्यक आहे. हेल्मेट वापरणे हा नियम आहे. आपल्या सुरक्षिततेचा विचार करता हेल्मेट वापरणे आवश्यक आहे.

मुलाखतकार : साक्षी कार्लेकर

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.