Drunk and Drive : पोलिस, महसूल अधिकारी आणि पुढारी यांच्या अभद्र युतीचे बळी!

आपल्या देशात कोणाला कायद्याची भीती नाही, हे यामागचे महत्त्वाचे कारण आहे. जो जितके कायदे मोडेल, तेवढी ती व्यक्ती जास्त महत्त्वाची आहे, असे आपल्याकडे समजले जाते.

140

पुणे, नागपूर आणि त्या पाठोपाठ वरळी येथील ड्रंक अँड ड्राईव्ह (Drunk and Drive) प्रकरणांमुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पुणे येथील पोर्शे कार प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाल्यानंतर तर व्यवस्थेच्या विरोधातील संताप अधिकच वाढला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी प्रचंड विरोध होत असताना चालू केलेल्या नाईटलाईफचे हे बळी आहेत की पोलिसांच्या कर्तव्यात कुठेतरी कसूर झालेली आहे, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. माजी पोलिस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर यांच्याशी आम्ही याविषयी संवाद साधला. सुधाकर सुराडकर यांनी या सामाजिक समस्येची केलेली उकल त्यांच्याच शब्दांत…

समाजाची नीतीमत्ता घसरली

राज्यात हिट अँड रन, तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह (Drunk and Drive) प्रकरणांत वाढ होण्यासाठी अनेक गोष्टी जबाबदार आहेत. पालक आणि पाल्य यांच्या संवादातील कमी, पाल्यांचे अनिर्बंध वागणे, काही पाल्यांचे अनिर्बंध केले जाणारे लाड, त्यांच्या चुकीच्या सवयींना घरातूनच दिले जाणारे प्रोत्साहन याही गोष्टी समाजात असे अपप्रकार घडण्यासाठी कारणीभूत आहेत. रात्री रस्ते मोकळे असतात, त्यामुळे गाडी जोरात चालवण्याची नशा डोके वर काढते. समाजाची नीतीमत्ता घसरलेली आहे, हे यात महत्त्वाचे आहे.

‘त्यांना’ वठणीवर कोण आणणार ?

अशा घटना घडण्याला नक्की कोण जबाबदार आहे, हेही पाहिले पाहिजे. अनधिकृत बार, पब कोणाच्या मर्जीने चालू आहेत? पोलिस, उत्पादन शुल्क विभाग, त्या त्या भागातील नगरसेवक, पुढारी, राजकारणी, संबंधित पदाधिकारी या सर्वांना हे सगळे माहिती असते. पोलिसांना पहिले सरळ केले पाहिजे. या सर्व क्षेत्रांतील सगळेच भ्रष्ट नाहीत; पण काही लोक भ्रष्ट आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी काय केले जाते? सध्याचे ड्रंक अँड ड्राईव्ह (Drunk and Drive) प्रकरणाचे बळी हे पोलीस, महसूल अधिकारी, पुढारी आणि पत्रकार यांच्या अभद्र युतीचे बळी आहेत.

(हेही वाचा : सर्वोच्च न्यायालय म्हणाले, घटस्फोटीत Muslim महिलेला पोटगी द्या; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा नकार म्हणते, आम्ही शरियत कायदे मानतो)

आपण पेटून उठत नाही

आपल्या देशात कोणाला कायद्याची भीती नाही, हे यामागचे महत्त्वाचे कारण आहे. जो जितके कायदे मोडेल, तेवढी ती व्यक्ती जास्त महत्त्वाची आहे, असे आपल्याकडे समजले जाते. कायदेही सर्वसामान्य व्यक्ती मोडत नाही, तर ज्यांचे वजन आहे, तेच कायदे मोडतात. आपल्या समाजात अजूनही नियम मोडला की, हा कोणीतरी मोठा आहे, असे समजले जाते. कोणीच कायदा मोडू नये, यासाठी आपण पेटून उठत नाही, ही समस्या आहे.

…तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही

दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जाते. आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये न्याय मिळत नाही, तर निकाल लागतो. वकील, पोलिस, न्यायाधीश यांचे खिसे भरले जातात. हे केवळ एका अपघातापुरतेच मर्यादित नाही, तर सर्वच क्षेत्रांसाठी लागू आहे. आपण वास्तव बघायला तयार असू, तरच बदल होईल. आपल्या समाजातील इमानदार प्रभावहीन आहेत. चांगली माणसे उदासीन झाली आहेत. आपल्याला कायद्याचे राज्य हवे आहे, यात कोणतीच शंका नाही.आपण जोपर्यंत संघटितपणे प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. (Drunk and Drive)

मुलाखत : सायली डिंगरे-लुकतुके

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.