दादर, सीएसटीएम, भायखळा रेल्वे स्थानकासह अमिताभ बच्चनच्या बंगल्याजवळ बॉम्ब ठेवण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून देणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कल्याण येथून अटक करण्यात आली आहे. दारू पीत बसलेलो असताना हुक्की आल्यामुळे कॉल केल्याची कबुली दोघांनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
बॉम्बने ‘ही’ ठिकाणे उडवण्याची दिली धमकी!
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास एक निनावी कॉल आला होता, कॉल करणाऱ्यांनी दादर, सीएसटीएम, भायखळा रेल्वे स्थानक आणि जुहू येथील अमिताभच्या बंगल्यात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली. कुठल्याही क्षणी धमाका होईल, असे देखील कॉल करणाऱ्याने सांगितले होते. कॉल करणाऱ्याने मला जी माहिती द्यायची होती ती दिली, मला आता डिस्टर्ब करू नका, असे बोलून मोबाईल स्विच ऑफ केला. या निनावी कॉलमुळे संपूर्ण पोलिस यंत्रणा रात्रीतून कामाला लागली, रेल्वे पोलिस, आरपीएफ, श्वान पथक, बॉम्ब निकामी पथकाने दादर, सीएसटएम आणि भायखळा रेल्वे स्थानकात रात्रभर शोध घेऊन काहीही मिळून आले नाही, तसेच जुहू पोलिस, श्वान पथके आणि बॉम्ब निकामी पथकाने अमिताभ बच्चन यांचा बंगल्याचा परिसर पिंजून काढला, मात्र तिकडे देखील काहीही मिळून आले नाही.
(हेही वाचा : भारताला आणखी एका लसीची साथ! कोरोनावर ‘सिंगल’ डोसने होणार मात!)
पोलिसांना त्रास देण्याची हुक्की आल्याने केला हा पराक्रम!
दरम्यान मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययु पथकाने फोन करणाऱ्यांचा शोध घेऊन कल्याण पश्चिम येथून राजू कांगणे आणि रमेश शिरसाठ या दोघांना ताब्यात घेऊन दोघांकडे कसून चौकशी केली असता आम्हीच कॉल केल्याची कबुली या दोघांनी दिली. मित्रांसोबत दारू पिण्यास बसलेले असताना या दोघांना पोलिसांना त्रास देण्याची हुक्की आली आणि दोघांनी मोबाईल फोनवरून बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती, अशी कबुली दोघांनी दिली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने या दोघांविरुद्धआझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून दोघांचा ताबा आझाद मैदान पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community