कोस्टल रोडमुळे मुंबईत सर्वात मोठा समुद्र पदपथ होणार

135

मुंबई महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागरी किनारा रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड प्रकल्पाचे काम आतापर्यंत ५० टक्क्यांहून पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे सागरी पदपथ मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. तब्बल २० मीटर रुंद व ८.५ किलोमीटर लांबीचा हा पदपथ समुद्राला जोडून व कोस्टल रोडलगत बांधला जाणार आहे‌. त्यामुळे हा मुंबईतील सर्वांत मोठा समुद्र पदपथ ठरणार असून मुंबईकरांना कोस्टल रोड आणि समुद्र यांच्यामधील या पदपथावर फिरत आनंद लुटता येणार आहे.

‘कोस्टल रोड’ची कामे निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू

मुंबई महापालिकेच्या या प्रकल्पाचे काम मागील अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरु होते, परंतु या कोस्टल रोड प्रकल्पाची जबाबदारी महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर सोपवल्यानंतर या प्रकल्पाला गती प्राप्त झालेली आहे. भुयारी मार्गांसह इतर कामांना आता गती मिळालेली असून आजवर ५० टक्क्यांहून अधिक काम झाले आहे. ‘कोस्टल रोड’ची कामे निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू असून पुढील वर्षाच्या अखेरीस म्हणजेच नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा सागरी किनारा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल, अशी अपेक्षा आहे. सागरी किनारा रस्त्यालगतच आता मुंबईतील सर्वात मोठा ‘समुद्री पदपथ’ आकाराला येत आहे.

(हेही वाचा आता ‘द गोवा फाईल्स’ चित्रपटाची मागणी! कोणी आणि कसे केले होते हिंदूंवर अत्याचार?)

३.४५ किमी लांबीचा ‘सागरी किनारा रस्ता’ हा बोगद्यातून जाणार

तब्बल २० मीटर रुंद व ८.५ किलोमीटर लांबीचा हा पदपथ समुद्राला जोडून व कोस्टल रोडलगत बांधला जाणार आहे‌. श्यामलदास गांधी उड्डाणपूल (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते ‘राजीव गांधी सागरी सेतू’च्या (वरळी वांद्रे सी-लिंक) वरळी बाजूपर्यंत १०.५८ किमी लांबीच्या सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम सध्या वेगात सुरु आहे. ३.४५ किमी लांबीचा ‘सागरी किनारा रस्ता’ हा बोगद्यातून जाणारा असणार असून सदर बोगदा श्यामलदास गांधी उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क दरम्यान असणार आहे. प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंतच्या सागरी किनारा रस्त्यालगत नवीन विस्तीर्ण समुद्री पदपथ बांधण्यात येणार आहे. प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंतच्या सागरी किनारा रस्त्यालगत ८.५ किमी लांबीचा सलग पदपथ बांधण्यात येणार आहे. या विस्तीर्ण पदपथाची रुंदी ही २० मीटर म्हणजेच सुमारे ६५ फूट एवढी असणार आहे.

समुद्री पदपथाची एकूण लांबी ८.५ किमी एवढी

सध्या नेताजी सुभाष मार्गालगत (मरीन ड्राईव्ह) असणारा ‘समुद्री पदपथ’ हा मुंबईतील सर्वात मोठा ‘समुद्री पदपथ’ असून त्याची लांबी सुमारे ३.५ किमी एवढी आहे. परंतु ‘कोस्टल रोड’ लगत आकारास येणारा ‘समुद्री पदपथ’ हा जवळपास दुपटीपेक्षा अधिक लांबीचा म्हणजेच ८.५ किमी लांबीचा असल्याने तो मुंबईतील सर्वात मोठा ‘समुद्री पदपथ’ ठरणार आहे. वरळी वांद्रे सी-लिंकच्या वरळी बाजूपासून प्रियदर्शनी पार्क दरम्यान असणा-या समुद्री पदपथाची एकूण लांबी ही ८.५ किमी एवढी असणार आहे. या पदपथालगत व पदपथांतर्गत सुशोभिकरणाच्या अनुषंगाने देशी झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांना बसण्यासाठी कट्ट्यांचे बांधकामही करण्यात येणार आहे. सध्या नेताजी सुभाष मार्गालगत असणारा समुद्री पदपथ हा सुमारे ३.५ किमी लांबीचा आहे. ही बाब लक्षात घेतल्यास भविष्यात कोस्टल रोडलगत आकारास येणारा हा समुद्री पदपथ मुंबईतील सर्वात मोठा पदपथ ठरणार आहे. सोबतच ‘कोस्टल रोड’ लगत ‘फुलपाखरू उद्यान’ आणि ‘जैवविविधता उद्यान’ उभारण्यात येणार आहे. सायकल ट्रॅक, खुले नाट्यगृह, उद्याने व खेळांची मैदाने, प्रसाधन गृहे इत्यादी बाबीही ‘कोस्टल रोड’ सोबत विकसीत करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘सागरी किनारा रस्ता’ प्रकल्पाचे प्रमुख अभियंता चक्रधर कांडलकर यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.