कोरोना इफेक्ट : शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के घट!

अभ्यासक्रमात घट करावी अशी मागणी सुरुवातीपासून अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती.

सलग दुसऱ्या शैक्षणिक वर्षाला कोरोनाचा फटका बसला आहे. शाळा प्रत्यक्ष सुरु झाल्या नाहीत, ऑनलाईन पद्धतीने शक्य तसे अध्ययन-अध्यापन सुरु आहे. त्याला मर्यादा येत आहेत. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यंदाच्या वर्षीही शालेय अभ्यासक्रमात २५ टक्क्यांनी घट करण्याची घोषणा केली आहे.

गेल्या वर्षीही केलेली घट!

सध्या राज्यात सर्वत्र शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने मर्यादित वेळेपुरते दररोज वर्ग घेतले जात आहेत. याचा शिक्षकांसह विद्यार्थ्यांवरही ताण येत आहे. म्हणून हा ताण कमी करण्यासाठी शालेय अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचा परिणाम म्हणून शिक्षकांवरील ताण काही प्रमाणात हलका होणार असून विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील अभ्यासाचा ताणही कमी होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे शाळा सुरु होण्याची शक्यता दिसत ऩसल्याने २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

शिक्षकांचीच होती मागणी

२०२१ मध्येही अशी गरज पडणार नाही, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र कोरोनाची आलेली दुसरी लाट, तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन राज्यभरात तूर्तास तरी शाळा सुरु होण्याची शक्यता कमी आहे. म्हणून शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत राज्य सरकारने या निर्णयाची घोषणा केली. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु असल्यामुळे अभ्यासक्रमात घट करावी अशी मागणी सुरुवातीपासून अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here