दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि मैदानातील हिरवळ राखण्यासाठी केलेला लाल मातीचा भरावा यामुळे मागील बुधवारी, 13 जुलै रोजी मैदानाच्या सभोवतालच्या रस्त्यावर पाणी साचले होते. मैदानात खोदण्यात आलेले रिंग वेल भरल्यानेच हे पाणी बाहेर आल्याचे बोलले जात असले, तरी बुधवारी असलेला मुसळधार पाऊस आणि समुद्राला असलेली भरती यामुळेच हे पाणी मैदानाबाहेर आले होते. त्यामुळे मैदानातील हिरवळ राखण्यासाठी केलेले काम आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या यंत्रणेचे काम योग्यप्रकारे होत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाच्यावतीने होत आहे.
सुमारे तीन कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले
छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील अर्थात शिवाजी पार्क मैदानातील धुळीमुळे आसपासच्या इमारतीतील रहिवाशी त्रस्त असून त्यांना दिलासा देण्यासाठी मैदानाच्या परिसरात हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. महापालिका जी/उत्तर विभागाच्या माध्यमातून मैदानाच्या भागात गवताळ परिसर निर्माण करण्यासाठी विहिरी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून रिचार्ज करत हे मैदान धुळमुक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या मैदानातील रेनवॉटरसह पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात आल्या आहेत. यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, या पावसाळ्यात बुधवारी मैदानातील लाल माती मिश्रीत पावसाचे पाणी वाहून रस्त्यावर जमा झाले होते. मैदानातील विहिरी भरल्याने यातील पाणी मैदानातून बाहेर वाहू लागले. यामध्ये लाल मातीही वाहून गेल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा सत्तांतरानंतर अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याचा अल्बम ‘तेरे बिन अब तो सनम…’)
नागरिकांच्या सुचनेनुसार त्या भागांमध्ये मुरुम टाकण्याचे काम
या संदर्भात आता महापालिका जी उत्तर विभागाच्यावतीने नियुक्त केलेल्या सल्लागारामार्फत तपासणीचे काम सुरु असून त्यात त्रुटी आहेत का किंवा नाही याचा अहवाल बनवला जात आहे. परंतु प्रथम दर्शनी तरी मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी मुसळधार पाऊस पडल्याने आणि विशेषत: बुधवारी मुसळधार पाऊस आणि समुद्राची भरती यामुळे मैदानांमधील पाण्याचा निचरा न होता ते रस्त्यावर साचले होते,असे बोलले जाते. परंतु साचलेल्या पाण्याचा निचरा अवघ्या काही तासांनी झाले आणि त्यानंतर मैदानातील पाण्याचा निचरा झाल्याने याठिकाणी उभारण्यात येत असलेल्या यंत्रणेमध्ये कोणताही दोष नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मैदानातील मध्यभागी माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यापासून उद्यान गणेश मंदिरात हिरवळीचा पट्टा राखण्यासाठी बनवण्यात आलेला रस्ता वाहून गेल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात येथील प्रत्यक्षात रस्ता वाहून गेल्याचे दिसून येत नाही. उलट रस्त्यांखालील दगडांचा भाग मातीने मजबूत झालेला आहे, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मैदानातील काही भागांमध्ये असमतल झाल्याने शिवाजी पार्क येथील नागरिकांच्या सुचनेनुसार त्या भागांमध्ये मुरुम टाकण्याचे काम करण्यात आले असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community