श्री गणरायांचे आगमन येत्या काही दिवसांत होणार असून मागील महिन्यापासून विश्रांती घेणाऱ्य पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. हा पाऊस येत्या काही दिवसांपर्यंत कायम राहिल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याने याचा परिणाम उत्सवाकरता लागणाऱ्या फुलांवर होणार आहे. याचा प्रामुख्याने परिणाम हा पिवळा चाफा तथा सोनचाफा या फुलावर होण्याची चिन्हे वर्तवली जात आहे. गणपतीला चाफा प्रिय असून येत्या काही दिवसांत पावसाने उघडीप न घेतल्यास याचा परिणाम चाफ्याच्या फुलांवर होईल आणि गणेशोत्सवात या फुलाचा सुगंध कमी दरवळेल, अशी भिती फुल विक्रेत्यांकडूनच व्यक्त केली जात आहे.
गणेशात्सवात आपल्या घरी विराजमान होणाऱ्या बाप्पांची मनोभावे सेवा करताना त्यांना प्रिय असलेली फुले आणि प्रसाद अर्पण करण्याचा प्रयत्न भाविक करत असतात. त्यामुळे गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या जास्वंदाच्या फुलासह केवडा, पिवळा चाफा ही फुले प्रामुख्याने अर्पण करण्याचा प्रयत्न भाविक करत असतात. परंतु मागील दोन दिवसांपासून सुरु झालेल्या पावसामुळे आणि पुढील आठवडा भर सुरु राहणाऱ्या या पावसामुळे पिवळ्या चाफ्याची आवक कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन दिवसांमधील पावसातच चाफ्याची आवक घटलेली पहायला मिळत आहे.
यासंदर्भात दादरमधील चाफ्याच्या फुलाचे होलसेल विक्रेते असलेल्या तुळशीराम फुल विक्रेते दुकानातील सर्वेश गांगणकर यांच्याशी याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले, सर्वसाधारणपणे आमच्याकडे वसईतूनच आमच्याकडे चाफ्याची फुले येत असतात. दिवसाला २० ते २५ हजार चाफ्याची फुले विक्रीला येत असतात, परंतु शनिवारी दोन ते तीन हजार एवढीच फुले विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकली. त्यामुळे शंभर फुलांसाठी दिवसाला २०० रुपयांचा दर होता. पावसाळा असल्याने अधिक फुले ही पाण्यामुळे खराब होत आहे. त्यामुळे बाजारात जास्त चाफ्याची फुले उपलब्ध होत नाही. चाफ्याच्या फुलांसाठी कडक ऊन महत्वाचे असते.
(हेही वाचा – DCM Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी स्वतंत्र “भूस्खलन देखरेख व अभ्यास संस्था” स्थापन करणार)
पावसाळ्यात या फुलांचे उत्पादन कमी होते. परंतु मागील काही दिवसांमध्ये पावसाने उघडीप घेतल्याने कडक उन्हामुळे चाफ्याची शेती चांगल्याप्रकारे होती आणि त्यामुळे आवकही वाढल्याने त्याचा दरही कमी होता. परंतु आता ऐन सणाच्या तोंडावर पुन्हा पाऊस पडू लागल्याने तसेच हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्यास गणेशोत्सवात ही आवक अधिकच कमी होईल आणि परिणामी ही फुले मिळणेही दुर्मिळ होऊन बसेल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. या फुलांच्या घाऊक विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार गणेशोत्सवात तसेही चाफ्याचा फुलांचा दर अधिकच असतो. एक फुल दहा रुपयांना किंवा आवक अधिक असल्यास २० रुपयांना तीन फुले विकली जातात. पण आता उत्सवापूर्वीच २० रुपयांना सहा फुले विकली जात असून या फुलांची आवकच कमी झाल्याने ऐन सणात ही फुले महाग होणे सोडा उलट आम्हाला विकायला तरी मिळतील का उलट प्रश्नच त्यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे होलसेल आणि घाऊक चाफा विक्रेत्यांच्या मनातील भीती पावसाने खरी करून दाखवल्यास यंदाच्या गणेशोत्सवात चाफ्याच्या फुलांचा सुगंध यंदाच्या गणेशात्सवात कमी होईल कि काय अशीच साशंकता निर्माण होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community