उद्घाटनासाठी मुलुंड कोविड सेंटरमधील आयसीयू बेडची सुविधा एक दिवस उशिराने सुरु?

उदघाटनाची प्रतिक्षेमुळे मुलुंड कोविड सेंटरमधील अत्यवस्थ असलेल्या आणि आयसीयू बेडची गरज असलेल्या रुग्णांना अन्य ठिकाणी हलवण्याची वेळ आली.

84

मुलुंड येथील जंबो कोविड सेंटरमध्ये रुग्णांची गरज ओळखून ३८ आयसीयू बेडची व्यवस्था वाढण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्यानंतर ऑक्सिजन तसेच अन्य सर्व बाबींची चाचणी गुरुवारी सकाळी पूर्ण झाली. त्यामुळे हे कक्ष गुरुवारपासून कार्यान्वित होणार होते. परंतु शिवसेनेला पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्तेच याचे उद्धघाटन करत ते समर्पित करण्याचे असल्याने या सर्व बाबींची जुळवाजुळव करेपर्यंत शुक्रवारची संध्याकाळ उजाडली. परंतु या एक दिवसांच्या कालावधीत याच केद्रांमध्ये अत्यवस्थ असलेल्या आणि आयसीयू बेडच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना अन्य ठिकाणी हलवण्याची वेळ आली. जर हे आयसीयू गुरुवारीच सुरु झाले असते, तर येथील रुग्णांची अन्य रुग्णालयात हलवाहलवी करण्याची वेळ आली नसती. परंतु शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या हट्टामुळेच येथील आयसीयू बेडची सुविधा एक दिवस उशिरा सुरु झाल्याचे बोलले जात आहे.

कोविड आयसीयू गुरुवारी सुरु होणे शक्य होते. याचा ड्रायरन हा जंबो सिलिंडरवर घेतला होता आणि त्याचा प्रेशर कमी असतो. पण जेव्हा ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर लावले गेले तेव्हा व्हेंटीलेटर लिकेज असल्याचे लक्षात आले. ते लिकेज काढण्यासाठी गुरुवारची रात्र गेली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी जेव्हा ते सुरु केले, तेव्हा तेथील लोड बॅलन्स होत नव्हते. त्यासाठी वेगळ्याप्रकारची केबल टाकण्याची गरज होती. हे काम शुक्रवारी सायंकाळी पूर्ण झाले. त्यानंतर शुक्रवारी रात्री जंबोमधून तीन रुग्ण आयसीयूमध्ये स्थलांतरीत केले. पण ते पूर्ण क्षमतेने अद्याप सुरु केलेले नाही. मात्र, या आयसीयू बेडच्या केंद्राचा कुठल्याही प्रकारे उद्घाटनासाठी प्रयत्न महापालिकेकडून झालेला नाही, तसेच कुठल्याही उद्घाटनासाठी आयसीयूचा शुभारंभ थांबवलेला नव्हता. 
– किशोर गांधी, सहायक आयुक्त, टि विभाग

मागील रविवारपर्यंत ३८ आयसीयू बेड सुरु करण्यात येत होते!

जंबो कोविड सेंटरसह इतर कोविड सेंटरमधील आयसीयूंची संख्या वाढवण्याची मागणी होत असतानाच मुलुंडमधील जंबो कोविड सेंटरमध्ये ‘टी’ विभागाच्यावतीने आयसीयू बेड वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मागील रविवारपर्यंत ३८ आयसीयू बेड सुरु करण्यात येत होते. परंतु ऑक्सिजन पुरवठ्याअभावी हे काम लांबणीवर पडले होते. त्यानंतर आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आल्यानंतर यासाठी लागणारे ऑक्सिजन याबाबतचे पुढील दोन दिवसांची चाचणी बुधवारी यशस्वीपणे पार पडली. त्यामुळे गुरुवारपासून टप्प्याटप्प्याने आयसीयू बेड सुरु करण्यात येणार असल्याची पूर्ण तयारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह कोविड सेंटरमधील डॉक्टरांनीही केली. परंतु प्रत्यक्षात हे आयसीयू बेड गुरुवारी सुरुच झाले नाही आणि शुक्रवारी संध्याकाळी या बेडची सुविधा रुग्णांना प्राप्त झाली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे याचे उद्घाटन केल्यानंतर ही सुविधा समर्पित करण्यात आली. विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांच्या विनंतीला मान देवून आदित्य ठाकरे यांच्याहस्ते या सेंटरचे उद्घाटन झाले असे शिवसेनेच्यावतीने जाहीर करण्यात आले.

(हेही वाचा : ‘प्राणवायू’शिवाय चालते भायखळ्याचे कोविड सेंटर!)

रुग्णांची झाली धावपळ!

परंतु याच केंद्रांमध्ये मागील दोन ते दिवसांपासून पाच ते सहा रुग्णांना आयसीयूची गरज होती. त्यामुळे इतर कोविड सेंटर तसेच खासगी रुग्णालयांमध्ये प्रयत्नही सुरु होता. परंतु कुठेही खाट रिक्त नसल्याने नातेवाईकांच्या पदरी निराशाच पडत होती. त्यातच गुरुवारपासून याठिकाणी आयसीयू बेड सुरु होईल, असेही सांगितले जात होते. परंतु गुरुवार उलटला तरी आयसीयू बेड सुरु न झाल्याने अखेर ज्या नातेवाईकांची व्यवस्था झाली त्यांनी आपल्या रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये हलवले. त्यातील एका रुग्णाच्या नातेवाईकांची मागील दोन दिवसांपासून आयसीयूसाठी धावपळ सुरु होती. परंतु गुरुवारपर्यंत तेथीलच आयसीयूची प्रतीक्षा करत अखेर विक्रोळी गोदरेज रुग्णालयात हलवले गेले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आयसीयूची चाचणी गुरुवारी सकाळीच पूर्ण झाली होती. त्यामुळे जर किमान त्यातील अत्यावश्यक असलेल्या रुग्णांना जर आयसीयूमध्ये दाखल करून घेतले असते तर त्यांना अन्य रुग्णालयात हलवावे लागले नसते. परंतु सत्ताधारी पक्षाला श्रेयाचे पडलेले असून याच्या उद्घाटनासाठी गेलेल्या एक दिवसाच्या अवधीमुळे तेथील रुग्णांना आयसीयूसाठी अन्य रुग्णालयांची वाट धरावी लागली. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या रुग्णसुविधेत सत्ताधारी पक्षाची श्रेयाची लढाई सुरु असून त्यामुळे या सुविधेपासून रुग्ण वंचित राहिल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांच्या हट्टामुळेच येथील आयसीयू बेड हे एक दिवस उशिरा सुरु झाल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.