जर फेब्रुवारीत कोरोना रुग्ण संख्येचा उच्चांक, तर मार्चमधील बोर्डाच्या परीक्षांवर गडांतर?

महाराष्ट्र कोविड फोर्सचे प्रमुख डाॅक्टर संजय ओक यांनी सांगितल्याप्रमाणे, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा मार्च महिन्यात होणार असल्याचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या वाढत्या रुग्ण संख्येमुळे मार्च महिन्यात होणा-या बोर्डाच्या परीक्षांवर गडांतर येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षांचा गोंधळ झाला होता, त्यामुळे तशी परिस्थिती आता निर्माण होऊ नये, म्हणून राज्य मंडळाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. राज्याचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अद्याप ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा घेण्यावर ठाम आहे.

कोरोनाचे वाढते संकट

राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने, पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या. सध्या केवळ दहावी आणि बारावीचेच वर्ग सुरु ठेवण्यात आले आहेत. तसेच दहावी, बारावीच्या परीक्षा लक्षात घेऊन 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरणही करण्यात आले आहे.

( हेही वाचा: आधी पंतप्रधानांवर हल्ल्याचा कट, आता संघाच्या मुख्यालयाची रेकी! यंत्रणा सतर्क)

राज्य मंडळाने स्पष्टता द्यावी

मात्र राज्यात कोरोना बाधितांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, या कोरोनाच्या तिस-या लाटेचे सावट दहावी, बारावीच्या परीक्षांवर येण्याची शक्यता आहे. पण अद्याप तरी राज्याचे माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ परीक्षा ऑफलाईन घेण्यावरच ठाम आहे. सध्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. परिस्थितीनुसार, परीक्षांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप दुस-या पर्यायाचा विचार केला गेला नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने दहावी आणि बारावी महत्त्वाची असल्याने राज्य मंडळाने परीक्षांबाबत स्पष्टता देणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here