गळतीच पळवतेय पाणी!

सेवा जलाशय ते लोकांच्या नळापर्यंत जाणाऱ्या मार्गात पाण्याची प्रमुख समस्या असल्याची बाब निदर्शनास येत असल्याचे पी. वेलारासू यांनी सांगितले.

प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबईत मागील काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र समस्या जाणवू लागली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या धरण आणि तलावांमध्ये मुबलक पाणी आहे. तिथून आलेले पाणी साठवून ठेवणाऱ्या सेवा जलाशयांमध्येही पाण्याचा साठा पुरेसा आहे. मात्र, तरीही पाण्याची तीव्र समस्या जाणू लागली असून या समस्येमागील मुख्य कारण आहे ती गळती. मागील काही दिवसांमध्ये ज्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये पाण्याची ही समस्या शोधण्याचा प्रयत्न केला असता गळती आढळून आल्या असून गळती दुरुस्त झाल्यानंतर त्या भागातील पाणी समस्याही दूर झाल्याचे पहायला मिळत आहे. खुद्द पाणी पुरवठा विभाग ज्या अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे आहे, त्या पी. वेलारासू यांनीच ही स्पष्ट कबुली स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

पाणी पुरवठा करणाऱ्या धरण व तलावांमध्ये पुरेसा साठा

मागील स्थायी समितीच्या बैठकीत पाणी समस्येमुळे कामकाज तहकूब करण्यात आले होते. या तहकूब सभेतील समस्याबाबत प्रशासनाने कोणकोणत्या उपाययोजना केल्या याची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. यावर बोलतांना अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण व तलावांमध्ये पाणी साठा पुरेसा आहे. तसेच सेवा जलाशयांमध्येही पाण्याची पातळी योग्य आहे. परंतु सेवा जलाशय ते लोकांच्या नळापर्यंत जाणाऱ्या मार्गात पाण्याची प्रमुख समस्या असल्याची बाब निदर्शनास येत असल्याचे पी. वेलारासू यांनी सांगितले.

(हेही वाचा : गटविमा बंदच, वैयक्तिक आरोग्य विमाही स्थायी समितीने लटकवला)

पाणी गळतीची दिली माहिती

विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या प्रभागात अभियंता व कर्मचाऱ्यांच्या बदलीमुळे जाणीवपूर्वक पाण्याची समस्या निर्माण केलेली नाही. एफ उत्तर व एफ दक्षिणला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला जोडणाऱ्या ३०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर व ट्रक टर्मिनस रोड येथे दुसरी गळती आढळून आली होती. तसेच तिसरी गळती जे.के. भसीन मार्गावर मुख्य जलवाहिनीवर आढळून आली. तर नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांच्या प्रभागात महानगर गॅस जंक्शनला १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला जोडणाऱ्या ३०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर गळती आढळून आल्याची माहिती वेलारासू यांनी दिली. त्यामुळे प्रत्येक छोट्या छोट्या तक्रारींकडे लक्ष देवून लोकप्रतिनिधींसह सामान्य माणसांचेही फोन उचलून त्यांना प्रतिसाद देत चला, अशा आपण सूचना दिल्याचेही वेलारासू यांनी सांगितले.

पाणी, रस्ते समस्या सोडवण्याचे निर्देश

त्यामुळे दोन प्रभागांमध्ये दहा ते बारा ठिकाणी गळती आढळून आलेल्या असून आजही पाण्याची सेवा जलशयांमधील पातळी योग्य प्रमाणात नाही. त्यामुळे आजही कुठे अधिक तर कुठे कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या तीन महिन्यांमध्ये सार्वत्रिक निवडणूक आहे. लोकांना दिलासा देण्यासाठी प्रणाली सुरळीत राखली गेली पाहिजे. निवडणूक जवळ आली की लोकांना पाणी आणि रस्ते आठवतात. त्यामुळे प्रशासनाने किमान या तरी सुविधा योग्य प्रकारे पुरवाव्यात, अशी सूचना राजा यांनी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागातील समस्या सोडवून त्यांचे समाधान होईल, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here