मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन केलेल्या वक्तव्यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले असून, आता याच वक्तव्याची उत्तर सभा राज ठाकरे मंगळवारी ठाण्यात घेणार आहेत. मंगळवारी होणा-या सभेसाठी वाहतुकीच्या काही मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही प्रवास करण्याआधी या बदलांविषयी जाणून घ्या.
या मार्गांत होणार बदल
- ठाणे स्थानक येथून डॉ. मूस चौकातून गडकरी रंगायतनच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना नौका विहार येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने शिवाजी पथमार्गे जांभळीनाका येथून जातील.
- गजानन महाराज चौक येथून राम मारूती रोड, गडकरी रंगायतनच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना पु.ना. गाडगीळ चौक येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने राम मारूती रोड मार्गे गोखले रोड येथून जातील.
- टेंभीनाका, टॉवरनाका येथून गडकरी रंगायतनच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना चिंतामणी चौक येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने चिंतामणी चौक येथून टेंभीनाका, चरईमार्गे जातील.
- खंडू रांगणेकर चौक येथून गोविंद बच्छाजी मार्गे गडकरी रंगायतनच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना आम्रपाली हॉटेल येथून वळण घेण्यास प्रवेशबंदी असेल. येथील वाहने चिटणीस रुग्णालयाकडून जातील.
( हेही वाचा: कंपनीच्या गेटवरच तब्बल 20 ईलेक्ट्रिक गाड्यांनी घेतला पेट! )
- सभेसाठी येणाऱ्या बसगाड्या तसंच इतर वाहनांना तीन हात नाका येथे थांबविण्यात येईल. त्यानंतर कार्यकर्त्ये चालत सभास्थानी जातील. तर वाहने आनंदनगर येथील जकातनाका येथे उभी केली जातील.
- कल्याण डोंबिवली भागातूनही सभेसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असणार आहे. कोर्टनाका येथे वाहन आल्यानंतर कार्यकर्ते वाहनांतून उतरतील. त्यानंतर या बसगाड्या साकेत जवळ उभ्या केल्या जातील. त्यामुळे या कालावधीत कोर्ट नाका आणि तीन हात नाका येथे वाहतूक कोंडीची शक्यता वर्तविली जात आहे.
- एदुलजी रोड येथून चरई मार्गे गोविंद बच्छाजी मार्गे वाहतूक करणाऱ्या वाहनांना दगडी शाळा येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने चिटणीस रुग्णालय येथून डावीकडे वळण घेऊन टेंभीनाक्याच्या दिशेने जातील.