तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील सुमारे २,४०० झाडांची पडझड झालेली असून त्यातील बहुतांशी झाडे ही मुळासकट उन्मळून पडलेली आहेत. यातील सुमारे ३५० झाडे ही एकट्या विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम येथील के पश्चिम विभागातीलच आहे. त्यामुळे या उन्मळून पडलेल्या झाडांच्या जागी पुन्हा नव्याने वृक्षारोपण करण्याचा संकल्प या विभागाचे महापालिका सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी केला आहे. त्यातील पहिले झाडे हे जेव्हीपीडी येथे सुप्रसिध्द अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांच्याहस्ते करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरीत सर्व जागांवर झाडे लावूनही हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कायम राखतानाच एकप्रकारे हरित मुंबईसाठी महापालिकेच्यावतीने प्रयत्न केला जात आाहे.
‘ट्री पेरेंट’ मोहिमेचे उद्घाटन!
चक्रीवादळामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये झाडांची पडझड झाली आहे. त्यातील महापालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये सुमारे ३५० झाडे पडल्यामुळे उन्मळून पडलेल्या या झाडांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यालगत मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परंतु या विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी उद्यान विभागावतीने याठिकाणी मोठ्या प्रमाणात पुन्हा झाडे लावण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रत्येक पडलेला झाडाचा खड्डा दत्तक घेवून वृक्ष पालक व्हा, अशाप्रकारे के पश्चिम विभागाच्यावतीने ‘मेक अर्थ ग्रीन अगेन मेगा फाऊंडेशन’ या खासगी स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने मोहिम रावबली जात आहे. महापालिकेच्या या ‘ट्री पेरेंट’ मेगावृक्ष मोहिमेचे उद्घाटन जे.व्ही.पी.डी मधील पडलेल्या झाडाच्या ठिकाणी ताम्हणचे झाड लावून करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक रेणु हंसराज, सहायक आयुक्त विश्वास मोटे, मेक अर्थ ग्रीन अगेन मेगा फाउंडेशनच्या अनुशा श्रीनिवासन अय्यर आणि वृक्षप्रेमी शान लालवाणी आणि पडलेल्या झाडाचा खड्डयाचे पालकत्व स्वीकारणारे योगेंद्र कच्छवा आदी उपस्थित होते.
(हेही वाचा : लसीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा केंद्राला डोस!)
या झाडे लावली जाणार!
यासंदर्भात बोलतांना के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी कोरोना काळात आपण ऑक्सिजनचे महत्व ओळखलेच आहे, असे सांगत किमान या पडलेल्या जागांच्या जागी तरी झाडे लावून हवेतील ऑक्सिजन टिकवण्याचा प्रयत्न करू, असे सांगत या मोहिमेची संकल्पना विषद केली. त्यामुळे वड, पिंपळ, उंबर, कांचन, कदंबा, गुंज, पळस, निम, महोगनी, मोह, बहावा, साग, अर्जुन, ऐन, किंजल, सीता अशोक, उंडाळ, नागकेशर, चंपा, शिवण, करिंज, बकुळ, बेल यासह तामण, हिरडा, बेहदा, नारळ, आमला, खैर, टेटू, आंबा, पुत्रंजीवा, वन्य बदाम, बिब्बा, परिजातक, रीटा, चंदन, फणस आणि चाफा आदी प्रकारच्या झाडांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार उर्वरीत ठिकाणी ही झाडे लावली जाणार आहेत. ही सर्व झाडे लावण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केला जात असून समाजातील लोकांना तसेच स्थानिकांना यामध्ये सामील करून घेण्यासाठी ही मोहीम राबवली आहे. यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे. हे झाड महापालिकेने लावल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्यांची काळजी घेणेही तेवढेच आवश्यक आहे. त्यामुळेच ही वृक्ष पालक मोहीम राबवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community