धोक्याची घंटा! नगर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन!

नगर जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये दहा पेक्षा अधिक रुग्ण आहेत. म्हणून या गावांमध्ये पुढील दहा दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

एका बाजूला कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे, त्यामुळे राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा-महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच वेळी मात्र दुसरीकडे धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सुमारे ६१ गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढली आहे. त्यामुळे आता या सर्व गावांमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हा निर्णय घेतला आहे.

गावांमध्ये सर्वत्र शुकशुकाट

या सर्व ६१ गावांमध्ये दहा पेक्षा अधिक रुग्ण आहेत. म्हणून या गावांमध्ये पुढील दहा दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या गावात शाळा, प्रार्थनास्थळ यासह अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार बंद राहणार आहेत. लॉकडाऊन काळात दूध संकलन डेअरीवर न करता थेट गोठ्यात जाऊन करावे लागणार आहे. बाहेरगावी कृषीमाल, भाजीपाला करणारे वाहनचालक अलगिकरणात ठेवावे लागणार आहे. तसेच इतर वाहनांच्या दळणवळणावर बंदी, प्रत्येक गावात नोडल अधिकारी नेमणूक अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे या सर्व गावांमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता.

(हेही वाचा : धक्कादायक! लखीमपूरमध्येही खलिस्तान्यांचा सहभाग?)

जिल्ह्यातील १४ तालुक्यांवर परिणाम

नगर जिल्ह्यातील ही ६१ गावे १४ तालुक्यांतील आहेत. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक गंभीर स्थिती संगमनेर तालुक्याची आहे. या एकाच तालुक्यातील सुमारे २४ गावांचा या लॉकडाऊनमध्ये समावेश आहे. श्रीगोंदा नऊ, रहाता सात तर पारनेर तालुक्यातील सहा गावांचा यात समावेश आहे. या व्यतिरिक इतर गावांत संसर्ग रोखण्यासाठी पाच पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी जाहीर केले आहे. जिल्ह्यात आजमितीला तीन हजार ९८५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. रोज पाचशे ते आठशे दरम्यान नव्या रुग्णांची भर पडत असून यात संगमनेर तालुक्यातील संख्या ही शंभर ते दोनशेवर दिसून येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here