Mumbai Municipal Corporation : आता भंगार विक्रेते महापालिकेच्या रडारवर

322
Mumbai Municipal Corporation : आता भंगार विक्रेते महापालिकेच्या रडारवर
Mumbai Municipal Corporation : आता भंगार विक्रेते महापालिकेच्या रडारवर

रस्त्यांवरील मॅनहोल्सच्या झाकणांची वारंवार चोरी होत असल्याने महापालिकेने आता स्थानिक विभागांमार्फत पोलिसांमध्ये तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. या झाकण चोरी होण्याच्या प्रकारामुळे आता महापालिकेनेही भंगार विक्रेत्यांना इशारा दिला आहे. कोणीही मलवाहिनीवरील किंवा पर्जन्य-जलनिःसारण वाहिनींवरील चोरीला, गहाळ झालेली डी.आय. किंवा सी.आय. बनावटीची झाकणे खरेदी करू नये. या बाबींचे उल्लंघन करणाऱ्या सर्व संबंधितांवर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही बाब गंभीर फौजदारी गुन्हा असून भारतीय दंडसंहिता कलम ४११ , ४१२, ४१३, ४१४ अनुसार दंडनीय अपराधही असल्याने याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेने म्हटले आहे.

मॅनहोलची झाकणे चोरीला जाण्यासारख्या प्रकारामुळे महानगरपालिका प्रशासनाकडून द्वितीय स्तरावर म्हणजे मॅनहोलच्या आतमध्ये संरक्षक जाळी लावण्याची मोहीम यापूर्वीच सुमारे १,९०० मॅनहोलच्या ठिकाणी राबविण्यात आली आहे. त्यासोबतच महानगरपालिकेकडून सर्व विभागांमध्ये विशेष मोहीम राबवून हरवलेल्या मॅनहोलच्या झाकणांची ठिकाणेही शोधण्यात आली आहेत. मॅनहोल्सची झाकणे चोरी होण्याच्या ठिकाणी सातत्याने पाहणी मोहीम राबवण्यात येत आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रोटोटाईपसाठी या सर्व १९०० मॅनहोलच्या जाळ्यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार अधिक मजबूत आणि वाजवी अशा मॅनहोलच्या संरक्षक जाळ्या तयार करण्यासाठी विविध प्रयोग केले आहेत. त्यामध्ये कास्ट आयर्न, माइल्ड स्टील, स्टेलनेस स्टील अशा विविध पद्धतीच्या धातूंचा वापर करून या संरक्षक जाळ्या तयार करण्यात आल्या आहेत.

मुंबईत विशेषत्वाने जोरदार पावसाप्रसंगी पाणी साचणाऱ्या ठिकाणी प्राधान्याने संरक्षक जाळ्या लावण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे. मुंबईतील मॅनहोलची मोठी संख्या पाहता आगामी पावसाळ्यापूर्वी संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रसंगी, मॅनहोल्सच्या झाकणांची चोरी झाली तरीही, ही संरक्षक जाळी काढणे सहज शक्य नसेल. म्हणजेच, मॅनहोलचे झाकण नसलेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा तर होईलच, मात्र सर्वात महत्वाचे म्हणजे अशा जाळ्यांमुळे नागरिक, प्राणी, वाहने यांना देखील संरक्षण मिळेल.

(हेही वाचा – APMC : टोमॅटोची आवक घटली, किलोचा दर पोहोचला ‘इतक्या’ रूपयांवर)

मुंबई महानगर क्षेत्रात मॅनहोल्सची झाकणे काढणे आणि चोरीला जाणे यांसारख्या प्रकारामुळे नागरिकांना अप्रिय घटनांना आणि अपघातांना सामोरे जाण्याच्या घटना या नजीकच्या कालावधीत समोर आल्या आहेत. अशा घटनांमुळे होणे संभाव्य धोके टाळण्यासाठीच महानगरपालिकेकडून झाकण नसणे किंवा चोरीला जाण्याच्या घटनांची दखल १२ तासांहून कमी कालावधीत घेऊन त्याठिकाणी कार्यवाही करण्यात येते. तसेच खुल्या मॅनहोलच्या ठिकाणी बॅरिकेडींग करण्यात येते. मॅनहोलशी संबंधित तक्रारी करण्यासाठी महानगरपालिकेने नागरिकांना आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि विभागीय कार्यालयांना संपर्क साधून माहिती तसेच तक्रार करण्याचे वारंवार आवाहन केले आहे. पर्जन्य जलवाहिन्या विभाग तसेच मलनिःसारण विभागाच्या नियंत्रण कक्षामार्फत मॅनहोलशी संबंधित तक्रारींची दखल घेऊन या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात येते. मुंबईतील नागरिकांनी कोणत्याही मॅनहोलचे झाकण उघडू नयेत, त्याप्रमाणे मॅनहोलची झाकणे काढण्याचा किंवा चोरी करण्याचा प्रयत्न होताना आढळल्यास आजुबाजूच्या नागरिकांनी दक्ष राहून त्वरित महानगरपालिका नियंत्रण कक्षाला कळवावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.