एसटी महामंडळाकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी; ११० कर्मचाऱ्यांचा थकीत रक्कम मिळण्याआधीच मृत्यू

185

एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जातात. मात्र २०१९पासून राज्यभरातील तब्बल ८ हजार ५०० निवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना ही रक्कम अद्याप महामंडळाकडून मिळालेली नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे २१० कोटी रुपये इतकी देणी थकीत असून एसटी महामंडळाकडे निधीची कमतरता असल्याचे कारण अधिकारी सांगत असल्याने अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या त्यांच्या जिल्ह्यातील विभागीय कार्यालयात गेल्या चार वर्षापासून फेऱ्या मारत आहेत.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ बस थांब्यांजवळ प्रवाशांना मिळणार ‘इलेक्ट्रिक बाईक’ सेवा; वर्षभरात १ हजार दुचाकी सेवेत येणार)

२१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी

ही रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नाही हे खरे असले तरी जे कर्मचारी सध्या कामावर आहेत त्यांच्या वेतनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात चार वर्षासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर निवृत कर्मचाऱ्यांच्या थकीत रक्कमेसाठी सुद्धा एक वेळचा पर्याय म्हणून २१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून एसटीला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यासाठी विशेष तरतूद करून निधी द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

११० पेक्षा जास्त निवृत्त कामगारांचा मृत्यू

संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळात सेवा केल्यावरसुद्धा महामंडळाच्या ८ हजार ५०० निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले आहेत. निवृत्त एसटी कर्मचारी अनेक थकीत देण्यांसाठी अनेक वेळा विभागीय कार्यालयात फेऱ्या मारतात. मात्र, अद्याप महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाहीत. गेल्या चार वर्षात थकीत देणी मिळण्याआधी ११० पेक्षा जास्त निवृत्त कामगारांचा मृत्यूही झाल्याची माहितीही बरगे यांनी दिली. यासाठी शासन स्थरावर पत्र व्यवहार करण्यात आला आहे. पण त्याला यश आलेले नाही अशी माहिती बरगे यांनी दिली.

निवृत्तीनंतरची सर्व देणी तात्काळ देण्याचे परिपत्रक असताना महामंडळात निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांची थकीत देणी मिळालेली नाहीत, हे अन्यायकारक असून मूळात इतरांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्यामुळे साहजिकच त्यांना निवृत्तीनंतरची रक्कम सुद्धा कमी मिळते. त्यातही सदर रक्कम थकीत राहिल्याने निवृत्त कर्मचारी व अधिकारी संकटात सापडले आहेत. यातील काही कर्मचारी विविध व्याधींनी आजारी झाल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. त्यांना औषध उपचारासाठी सुद्धा रक्कम मिळालेली नाही, असेही बरगे यांनी यावेळी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.