कोरोनाकाळात तृतीयपंथीयांची ना वाजली टाळी ना दिली कुणी थाळी 

159
सुशांत सावंत

तृतीय पंथीय या समाजातील दुर्लक्षित घटकाला स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना सरकारने आत्मनिर्भर बनवण्याची नितांत गरज बनली आहे, कारण कोरोनाच्या कालखंडात मागील ६-७ महिन्यांच्या लॉक डाऊनमध्ये त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लोकल गाड्यांमध्ये किंवा रस्त्यांवरील सिग्नलवर भीक मागून पैसे कमावणे, हेच एकमेव माध्यम तृतीय पंथियांकडे जीवन जगण्यासाठी आहे. यामुळेच लॉक डाऊनमध्ये त्यांची केविलवाणी स्थिती झाली.

कोरोनामुळे सध्या मुंबईमध्ये लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. मात्र करोनामुळे ना त्यांना लोकलमध्ये जाता येतं ना सिग्नलवर उभे राहता येतं. त्यामुळे कोरोना काळात ना त्यांच्या हातात पैसा मिळाला ना कुणी त्यांच्यासमोर जेवणाची थाळी पुढे केली.

सरकारी मदतीपासूनही वंचीत

मुंबईमध्ये आज लाखोंच्या वर तृतीयपंथीय वास्तव्य करत आहेत. सायन धारावी, मस्जिद बंदर, भायखळा, माहीम, गोवंडी, मानखुर्द, वाशी, अंधेरी, गोरेगाव, दहिसर, वसई, नालासोपारा याठिकाणी तृतीय पंथीयांच्या अनेक वस्त्या आहेत. पण त्यांच्यापर्यंत सरकारी मदत अजून पोहोचलीच नाही.

ना रेशनकार्ड ना धान्य

कोरोना काळात सरकारने शिधा पत्रिकेवर धान्यांचे वाटप केले मात्र मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने राहणाऱ्या या तृतीय पंथीयांकडे ना रेशन कार्ड ना अन्य कोणतेही सरकारी कागद. त्यामुळे रेशनचे धान्य तरी कसे मिळणार असा सवाल देखील हे तृतीयपंथी उपस्थित करु लागले आहेत. अनेक तृतीय पंथीयांकडे उपजीविकेचे कोणतेच साधन या काळात उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात मानसिक तणावातून ते जात आहेत. अनेक सामाजिक संस्था त्यांना मदत करीत असल्या तरी ही मदत तोकडी पडते. त्यामुळे सरकारी मदतीची गरज आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री धनजंय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिली, परंतु अजून कुणी प्रतिसाद दिला नाही. सरकारने कोरोनाच्या लढ्यात जे बटेज जाहीर केले त्यामध्ये तृतीय पंथीयांचा उल्लेखही नाही. मग आम्ही या समाजाचा घटकच नाही का?, असे सामाजिक कार्यकर्त्या प्रिया पाटील म्हणाल्या.

तर समाजामध्ये आधीच तृतीय पंथीय दुर्लक्षित होतेच, परंतु कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हा घटक आणखीच दुर्लक्षित झाला आहे. अनेक तृतीयपंथी गलिच्छ वस्तीत एकटेच घरात राहत असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. सरकार आमच्या परिस्थितीकडे कधी लक्ष देणार?, असे तृतीयपंथीय शोभा म्हणाल्या.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.