मुंबईत एका बाजुला स्वच्छता मोहिम राबवत कचरा आणि डेब्रीजचा राडारोडा उचलण्यावर भर दिला जात असतानाच ऐन गणेशोत्सवामध्ये दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानक परिसरात फुल विक्रेत्यांसह फेरीवाल्यांमुळे कचऱ्याचे ढिग निर्माण झाले आहेत. गणेशोत्सवामध्ये फुलांनी असणारी मागणी लक्षात घेता फुल विक्रेत्यांनी जावळे मार्गासह अडवून ठेवला. परिणामी याठिकाणी कचरा साफ करण्यासही जागा शिल्लक राहिलेल नसून सफाई कामगारांनी गोळा करून ठेवलेला कचराही उचलण्यासाठी वाहन आतमध्ये शिरु न शकल्याने केशवसुत उड्डाणपूलाखाली तसेच शेजारी कचऱ्याचे ढिग पडलेले पहायला मिळत आहेत.
मुंबईमध्ये मागील दोन आठवड्यांपासून विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येत असून विविध ठिकाणी असणारे कचऱ्याचे ढिग आणि डेब्रीजचा राडारोडा उचलला जात आहे. मागील २० दिवसांमध्येच घनकचरा व्यवस्थापन विभागाने सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत ५ हजार ७८६ मेट्रिक टन इतका कचरा आणि राडारोडा संपूर्ण मुंबईतून जमा करुन वाहून नेला आहे. यामध्ये ४ हजार १८३ मेट्रीक टन राडा रोडा अर्थात डेब्रीजचा समावेश होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी संबंधित विभागांना सर्व महापालिका विभागीय सहायक आयुक्तांनां स्वच्छता मोहिम राबवून कचरा आणि राडारोडा उचलण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार ही स्वच्छता मोहिम राबवली जात असतानाच दुसरीकडे दादर पश्चिम भागांमध्ये फेरीवाल्यांअभावी स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले असून पदपथांवर कचऱ्याचा चिखल झाल्याने त्यातूनच वाट काढत नागरिकांना फुलांची खरेदी करावी लागत आहे.
(हेही वाचा – Dagdusheth Halwai Ganpati : पुण्यातील ससूनमधील रुग्णांनीही घेतले ‘दगडूशेठ’ बाप्पाचे दर्शन; वाचा कसे…)
दादर पश्चिम येथील फुल बाजाराच्या परिसरात केशवसुत उड्डाणपूलाखाली तसेच या पुलाला जोडणाऱ्या जावळे मार्गावर फुलांचा तसेच इतर साहित्यांचा कचऱ्याचे ढिग लागलेले पहायला मिळत आहे. केशवसुत उड्डाणपूलाखालील गाळ्यात निम्मा गाळा हा फुलांच्या कचऱ्याने भरुन गेला असून या कचऱ्याच्या शेजारीत मोगरा तसेच इतर फुलांचे गजरे विकणाऱ्या महिला बसलेल्या आहेत. त्यामुळे लोकांना तिथून चालताही येत नाही. गाळ्यातील हा कचरा आता बाहेर पसरु लागला आहे. इतर ठिकाणचा कचराही महापालिकेचे सफाई कामगार याठिकाणी आणून जमा करत आहेत.
शिवाय येथील चौकातही कचऱ्याचे ढिग लागलेले असून या कचऱ्याच्या शेजारीच चारही बाजुंनी फुल विक्रेत्यांचा वेढा पडलेला आहे. फुल विक्रेते तसेच अन्य वस्तुंचे विक्रेत असलेल्या फेरीवाल्यांमुळे हा कचरा उचलण्यात अडचणी येत असतानाही महापालिकेला या फेरीवाल्यांना बाजुला करून ही सफाई करता येत नाही. त्यामुळे फेरीवाल्यांमुळे संपूर्ण दादर परिसरात अस्वच्छता पसरलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे महापालिकेचे अधिकाऱ्यांना स्वच्छता नाही झाली तरी चालेल पण फेरीवाल्यांना हटवून आम्ही ही स्वच्छता राखणार नाही, असाच पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community