दिवाळीची पहिली आंघोळ; नळाला पाणी थेंब थेंब

अधिका-यांना दम देण्याची नगरसेवकांची मागणी.

101

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याचा साठा मुबलक असूनही मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरोनानंतर यावर्षी आपण मोकळेपणाने दिवाळीचा सण साजरा करत आहोत. पंरतु मुंबईतील सर्वच भागांमध्ये पाण्याची तीव्र समस्या असून दिवाळीत पहिल्या आंघोळीला पाणी मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा पाहता पहिल्या आंघोळीलाच नळातून येणाऱ्या थेंब थेंब पाण्यामुळे बादली तरी भरेल का, अशी चिंता आता व्यक्त होत आहे. पाण्याची ही समस्या महापालिकेच्या जलअभियंता विभागातील अभियंत्यांच्या नियोजनाच्या अभावामुळेच निर्माण झालेली असून सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवरच शंका उपस्थित केली आहे.

लोकप्रतिनिधी त्रस्त

मुंबईत कुर्ला येथील भाजपचे नगरसेवक हरिष भांदिर्गे हे सातत्याने पाण्याच्या समस्येबाबत बोलत असून प्रसंगी त्यांनी आंदोलनही केले आहे. परंतु वारंवार सांगूनही योग्य दाबाने पाणी येत नसल्याने त्यांनी अभियंत्याला शिवीगाळ केली. याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. तर याच एल विभागातील शिवसेना नगरसेवक किरण लांडगे यांच्या उपस्थितीत नारायण नगर येथील लोकांनी पाण्याच्या समस्येवर अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. याप्रकरणीही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा जामीनाचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. मात्र, कुर्ला  भागातील ही पाणी समस्या असतानाच आता विरोधी पक्षने रवी राजा यांनी एफ उत्तर विभागातील पाणी समस्येवर प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. आजवर प्रशासनाचे अधिकारी नगरसेवकांच्या विरोधात एफआयआर दाखल करत असताना विरोधी पक्षनेत्यांनी नागरिकांना पाण्याच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याने प्रशासनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचा इशारा दिला आहे. आपल्या विभागात अभियंत्यांनी जाणीवपूर्वक एका कामगारावरील राग आपल्यावर काढत आपल्या विरोधात चावी फिरवत ही समस्या निर्माण केल्याचा आरोप केला आहे.

(हेही वाचा : विरोधी पक्षनेत्यांनाच अभियंत्यांनी दाखवले ‘पाणी’)

…तर अधिका-यांना दम द्या

पाण्याची ही समस्या केवळ कुर्ला आणि अँटॉप हिल भागातच नाही, तर बोरीवली-दहिसर भागासह मालाड, अंधेरी-जोगेश्वरी पश्चिम भाग, भायखळा, विक्रोळी गावठाण, चांदिवली, वांद्रे पूर्व, कांदिवली चारकोप परिसर, विलेपार्ले ते अंधेरी पूर्व आदी भागांमध्ये पाण्याची तीव्र समस्या आहे. ही सर्व पाणी समस्या ही केवळ लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्यासाठी केली जात असल्याची बाब समोर येत आहे. जोगेश्वरी पश्चिम येथील येथील शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांनी आपण विभागातील अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात आवाज उठवल्यानंतरच आपल्या विभागात पाण्याची समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. तर शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी आपल्या विभागात पाणी समस्या निर्माण झाल्यानंतर आपण जेव्हा दम भरला, तेव्हा दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठा सुरळीत झाल्याचे सांगितले. जर दम देवून पाणी पुरवठा सुरळीत होत असेल, तर स्थायी समिती अध्यक्षांनी सर्वांना दम द्यायला हवा, जेणेकरून दिवाळीच्या सणात तरी लोकांच्या घरी पाणी येईल आणि पाण्यावरून होणारे वाद विवाद, भांडणे या सणात टाळता येतील, अशी सूचना भाजपचे गटनेते विनोद मिश्रा यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.