काही वर्षांपासून मुंबईतील हवा दुषित होत चालली आहे आणि त्याचे दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणाऱ्या पाच ठिकाणी खुल्या हवेतील धूळ शमन केंद्र आणि धूळ नियंत्रण प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एक नग धूळ नियंत्रण प्रणाली २ नग खुल्या हवेतील धूळ शमन केंद्र असा एक संच अशाप्रकारे पाच संच बसवण्यात येणार आहे.
मागील दशकापासून मुंबईत वाहन वापरात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या उत्सर्जनामुळे धुळीचे कण हवेत पसरुन शुध्द हवेची पातळी दिसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे वाहनात उपस्थित असलेल्या नागरिकांना व रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना दुषित हवेत श्वसन करुन दीर्घ आजारांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईत सुरू असलेले बांधकाम, वाहन उत्सर्जन यामुळे धुळीचे साम्राज्य वाढत चालले आहे, त्यामुळे काही वर्षांपासून मुंबईतील हवा दुषित होत चालली आहे आणि त्याचे दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
(हेही वाचा – वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला वीर सावरकरांचे नाव देणार; २८ मे रोजी होणार घोषणा)
त्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी होणाऱ्या पाच ठिकाणी खुल्या हवेतील धूळ शमन केंद्र (Outdoor Dust Mitigation Unit) आणि धूळ नियंत्रण प्रणाली (Dust Monitoring System) यांचा आराखडा तयार करून तेथे या संचाचा पुरवठा करून त्याची उभारणी करण्यासाठी तसेच तीन वर्षांची देखभाल आदी कामांसाठी प्रमुख अभियंता विभागाने निविदा मागवल्या होत्या. यात मॅक एनवायरोटेक ऍन्ड सोल्युशन्स (इंडिया) प्रा. लि. ही कंपनी पात्र ठरली असून १०.३७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशात अत्यंत मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकास कामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे हवेचा गुणवत्ता स्तर सध्या खालावला आहे. ही बाब लक्षात घेता प्रदूषणासाठी धूळ हा देखील एक घटक कारणीभूत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या अहवाल नुसार पाच ठिकाणी धूळ शमन आणि धूळ नियंत्रण प्रणाली बसवण्याची शिफारस करण्यात आली होती, त्यानुसार निविदा मागवून पात्र कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community