मुंबईचे रस्ते धुणार पाण्याने

धूळ मुक्त मुंबईसाठी आता रस्तेही पाण्याने धुतले जाणार असून रस्त्यांवर व वाहतूक चौकात पाणी फवारणी करून स्वच्छता करू शकणारे ५० संयंत्र तर सूक्ष्म पद्धतीने पाणी फवारणी करणारे ५० संयंत्र असे एकूण १०० वाहन आरूढ १०० संयंत्र खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहने ताफ्यात आल्यानंतर मुंबईचे रस्ते धुण्याची कामे हाती घेऊन धुळीच्या प्रदूषणापासून मुंबईकरांची सुटका केली जाणार आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून हवामान विषयक कारणांमुळे तसेच सर्वत्र सुरू असलेल्या विविध विकास कामांमधून निर्माण होत असलेल्या धुळीमुळे हवेचा गुणवत्ता स्तर खालावला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासनातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची ८ मार्च २०२३ रोजी महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
या दृष्टिकोनातून हवा शुद्धिकरण करणारी वाहन आरुढ सुमारे २०० संयंत्रे खरेदी करण्याची कार्यवाहीही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. हवेतील धुळीला अटकाव करण्यासाठी कलानगर, मानखुर्द, हाजी अली, दहिसर आणि मुलुंड चेक नाका या पाच ठिकाणी धूळ कमी करणारी यंत्रणा उभारली जाणार असून त्याबाबतची कार्यवाही देखील प्रगतीपथावर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईतील ५ हवा गुणवत्ता केंद्र होणार १५ मेपर्यंत कार्यान्वित

मुंबई महानगरातील हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ११ ठिकाणी तर भारतीय हवामान खात्याकडून ‘सफर’ अंतर्गत ९ ठिकाणी केंद्र उभारण्यात आले आहे. याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेकडून आता शिवडी, गोवंडी, पंतनगर (घाटकोपर), भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि चारकोप (कांदिवली) अशा पाच ठिकाणी हवा गुणवत्ता संनियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचे कार्यादेशही  देण्यात आले आहेत. ही पाचही केंद्र दिनांक १५ मे २०२३ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे, अशी माहितीही याप्रसंगी देण्यात आली.

पाच ठिकाणी बसवणार धूळ कमी करणारी यंत्रणा

हवा शुद्धिकरण करणारी वाहन आरुढ सुमारे २०० संयंत्रे खरेदी करण्याची कार्यवाहीही सुरु आहे. हवेतील धुळीला अटकाव करण्यासाठी कलानगर, मानखुर्द, हाजी अली, दहिसर आणि मुलुंड चेक नाका या पाच ठिकाणी धूळ कमी करणारी यंत्रणा उभारली जाणार असून त्याबाबतची कार्यवाही देखील प्रगतीपथावर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here