गेल्या काही काळापासून देशभरासह संपूर्ण राज्यातील तापमानात कमालीची वाढ होताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेने नागरिक त्रस्त झालेले असताना, आता नासाच्या एका रिपोर्टमध्ये महत्वाची माहिती समोर येत आहे. पृथ्वीचे तापमान झपाट्याने वाढत असल्याचे नासाने केलेल्या एका संशोधनात म्हटले आहे. त्यामुळे ही एक चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे.
(हेही वाचाः गॅस दरांचा नवा उच्चांक, मुंबईतले दर वाचून होईल संतापाचा ‘भडका’)
तापमान वाढीचा दर तिप्पट
गेल्या 20 वर्षांमध्ये जगभरातील तापमान वाढीचा दर हा तिप्पट असल्याचे नासाच्या संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. पृथ्वीच्या मार्गामध्ये येणा-या आणि जाणा-या उष्णतेचा समतोल राखला जात नसल्याचे देखील नासाने आपल्या संशोधनात म्हटले आहे. गेल्या 20 वर्षांतील तापमानाचे निरीक्षण केल्यानंतर ही माहिती समोर आली असून, जगभरातील सर्व देशांसाठी ही एक धोक्याची घंटा असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः अमेझॉन, फ्लिपकार्टवर एका वर्षात विकल्या गेल्या इतक्या बनावट वस्तू)
उष्णता शोषून घेण्याचे प्रमाण वाढले
पृथ्वीला दिवसभर सूर्याकडून मिळणारी उष्णता ही रात्रीच्या वेळी पुन्हा आकाशात फेकली जाते. त्यामुळे जेवढी उष्णता पृथ्वीला सूर्याकडून मिळाली ती सर्वच्या सर्व उष्णता पुन्हा जात नाही, तर त्यातील काही उष्णता पृथ्वी शोषून घेते. यामुळे जमिनीलगतची हवा तापते. गेल्या 20 वर्षांत पृथ्वीचे उष्णता शोषून घेण्याचे हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णता सातत्याने वाढत आहे. यामुळे पृथ्वीवरील बर्फ वेगाने वितळत असून, समुद्राच्या पातळीत कमालीची वाढ होत आहे. याचा परिणाम आपल्या पूर्ण ऋतुचक्रावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी वातावरणातील हानिकारक वायूंचे प्रमाण कमी करणे हा त्यावरील उपाय असल्याचे हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community