आता देशभरात हवाई मार्गाने प्रत्यारोपणासाठी अवयव पोहोचवणे होणार अधिक सोपे

गरजू रुग्णाला अवयव देण्यासाठी देशात विविध राज्यांतून हवाईमार्गे अवयव पोहोचवले जातात. मात्र अवयव विशिष्ठ कालावधीत मिळाल्यास अवयवदान करता येते. कित्येकदा हवाई मार्गातील प्रवासात अवयव खराब होण्याचीही भीती असते. हवाई मार्गाने अवयव पोहोचवणे सुखकर होण्यासाठी राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीने (नॉटो)ने आता विमानात विशेष डब्बे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. परळ येथील केईएम रुग्णालयात उतीपेशी बँकेचे उद्घाटन करताना नॉटोचे संचालक डॉ. कृष्णन कुमार यांनी ही माहिती दिली.

( हेही वाचा : अयोध्येतील राम मंदिर केव्हा तयार होणार? अमित शाहांनी सांगितली तारीख )

राष्ट्रीय पातळीवर अवयवदानाच्या मोहिमेसाठी विमान मार्ग तसेच रस्ते मार्गाचा अवलंब केला जातो. परराज्यातील मृत रुग्णाकडून अवयव आणण्यासाठी हवाई मार्गाचा अवलंब केला जातो. राज्यात मुंबई आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये अवयवदान मोठ्या प्रमाणात होते. मुंबईतील रुग्णांना बऱ्याचदा प्रत्यारोपण प्रक्रियेदरम्यान हृदय परराज्यातून मिळते. ही केवळ मुंबईपुरतीच समस्या नाही, तर देशपातळीवर अवयवदानासाठी आता नॉटोच्यामार्फत काम केले जात आहे. विमानात अवयव सुखरुप स्थितीत रहावे यासाठी विशेष केबिन सुरु करण्यासाठी हवाई मंत्रालयासोबत चर्चा सुरु आहे, अशी माहिती डॉ. कृष्णनन कुमार यांनी दिली. हृदय, मूत्रपिंडे आदी वेगवेगळ्या अवयवांच्या आकारानुसार डब्यांची रचना केली जाणे आवश्यक आहे. त्यानुसार डबे आणि विशेष केबिन बनवले जाणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

हवाई मंत्रालयासोबत चर्चा अंतिम टप्प्यात आल्यानंतर आम्ही आयआयटीच्या तज्ज्ञांची मदत घेऊ. त्यानुसार, विशेष डब्यांची रचना केली जाईल, जेणेकरुन अवयव योग्य रितीने डब्यात ठेवले जातील. केवळ विमानमार्ग नव्हे तर अवयव वेळेवर पोहोचण्यासाठी आवश्यक उपयायोजनांसाठी जलवाहतूक, रस्ते वाहतूक मंत्रालायशीही बोलणे सुरु असल्याचे ते म्हणाले. अवयव पोहोचण्यासाठी येणा-या खर्चात कपात कशी करता येईल, यावरही आम्ही काम करत असल्याची माहिती डॉ. कुमार यांनी दिली.

तीन आकारांचे डब्बे तयार होणार

अवयव सुखरुप पोहोचवण्यासाठी तीन आकाराचे डब्बे बनवले जातील. अवयवांच्या आकारानुसार डब्यांची रचना असेल. हातासाठी, फुप्फुसांसाठी तसेच इतर अवयवांच्या रचनेप्रमाणे डब्यांची निर्मिती केली जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here