जुने घर खरेदी केल्यानंतर त्याचे वीज बिल नावावार करण्यासाठी महावितरणच्या वेगवेगळ्या कार्यालयांत खेटे घालावे लागतात. बहुतांश ग्राहकांना त्याचा अनुभव घेतला असेल. मात्र, आता महावितरणच्या ‘इझ ऑफ लिव्हिंग’ उपक्रमांतर्गत घर खरेदीनंतर वीज बिल जुन्या मालकाच्या नावावरून नवीन खरेदीदाराच्या नावावर सहजपणे माहिती- तंत्रज्ञानाच्या आधारे होणार आहे. त्यासाठी कोणताही अर्ज करण्याची किंवा प्रतिज्ञापत्र देण्याची गरज नाही.
( हेही वाचा : ९२ च्या दंगलीतील आरोपीला १८ वर्षांनी अटक)
एखाद्या व्यक्तीने जुने घर किंवा दुकान खरेदीनंतर मुद्रांक शुल्क भरून संबंधित विभागाकडे नोंदणी केली की त्यानंतर त्या घराचे किंवा दुकानाचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून आपल्या नावावर करण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. या बदलासाठी महावितरणकडे अर्ज व सोबत कागदपत्रे दाखल करून प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जात असे. या प्रक्रियेत कागदपत्रांच्या पडताळणीत वेळ जात असल्याने ग्राहकांना अनेकदा पाठपुरावा करावा लागत होता.
नवी पद्धत अशी…
- नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टम जोडण्यात आली आहे.
- नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाली की महावितरणला संदेश पाठविला जातो.
- त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठविला जातो व आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्यास कळविले जाते.
- हे शुल्क ग्राहक घरात बसून ऑनलाइनही भरू शकतो. फी भरली की विजेचे बिल नावावर होत असल्याने ग्राहकांची फरफट थांबणार आहे.
- नव्या प्रक्रियेत वीज बील नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करणे, कागदपत्रे दाखल करणे, पडताळणी करणे व पाठपुरावा करणे हे सर्व कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.