एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली 350 विद्यार्थ्यांची फसवणूक, ईडीचा दणका

सातारा जिल्ह्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अध्यक्षांना ईडीनं दणका दिला आहे. मायणी येथे असलेल्या या महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष महादेव देशमुख यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशात विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आल्याचे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे.

महादेव देशमुख यांनी आपल्या सहका-यांसह वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेत त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. 350 विद्यार्थ्यांची फसवणूक करत तब्बल 65.7 कोटी रुपये कमावल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.

विद्यार्थ्यांची फसवणूक

सातारा येथे असलेल्या छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमध्ये एमबीबीएसच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येत होते. मात्र या प्रवेशांसाठी मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडून आवश्यक ती परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून केवळ पैसे घेण्यात आले पण त्यांना त्या बदल्यात प्रवेश काही मिळाला नाही, तसेच त्यांचे पैसेही परत करण्यात आले नाहीत.

ईडीच्या आरोपपत्रात माहिती

विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी संस्थेला दिलेल्या रक्कमेचा उल्लेख ईडीने आपल्या आरोपपत्रात केला आहे. लाखो रुपये गोळा करुन या विद्यार्थ्यांना त्याची पावती देखील देण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी याबाबत तक्रार केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेसाठी हवालाच्या माध्यमातून 15 ते 20 कोटी रुपये मिळवल्याचं ईडीकडून चार्जशीटमध्ये सांगण्यात आले आहे. त्यासाठी अंगाडिया व्यावसायिकाची मदत घेण्यात आली असून, त्या व्यावसायिकाला 3 ते 4 लाख रुपये कमिशन देण्यात आल्याचे ईडीच्या चौकशीत समोर आले आहे.

विद्यार्थ्यांकडून रोख रक्कम घेऊन ते पैसे छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या खात्यावर रुग्णालयाची कमाई म्हणून जमा करण्यात आली असल्याचे दाखवण्यात आले होते. महादेव देशमुख, मोहम्मद सिद्दिकी आणि इतर सहका-यांच्या खात्यात ही रक्कम वळवण्यात आली असल्याचे ईडीने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here