कोविड बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेपाठोपाठ ईडीकडून मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, मनपा अधिकारी आणि एका खासगी कंपनीचा या गुन्ह्यात समावेश असून लवकरच ईडीकडून यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात येणार असल्याचे समजते.
कोविड काळात खरेदी करण्यात आलेल्या बॉडी बॅग चढ्या भावाने खरेदी करण्यात आल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात आरोपी म्हणून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई मनपाचे माजी अतिरिक्त आयुक्त, वेदांत इन्फोटेक कंपनीचे कंत्राटदारसह ६ जणांचा समावेश आहे.
या गुन्ह्याचा समांतर तपास ईडीकडून करण्यात येत होता, ईडीने आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्हासंदर्भातील कागदपत्रे मिळविली. या कागदपत्राच्या आधारे ईडीने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी आणि वेदांत कंपनीचे कंत्राटदार यांच्या विरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ईडीकडून लवकरच या प्रकरणात संशयिताकडे चौकशी करण्यासाठी समन्स जारी करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Irshalwadi tragedy :इरशाळवाडी दुर्घटनेत शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकांना मदत मिळणार)
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी ४ ऑगस्ट रोजी किशोरी पेडणेकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त, केंद्रीय खरेदी विभागाचे महापालिका उपआयुक्त आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध नोंदवलेल्या प्रथम खबरी अहवालाच्या आधारावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कोविड-१९ पीडितांसाठी बॉडी बॅग खरेदीमध्ये कथित घोटाळा केल्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना चार आठवड्यांसाठी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. न्यायालयाने पेडणेकर यांना या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही दिले होते आणि त्यांना ११ सप्टेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.
आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी महानगरपालिका उपआयुक्त रमाकांत बिरादार यांची चौकशी केली होती, बिरादार यांनी महामारीच्या काळात मनपाच्या खरेदी विभागाची जबाबदारी सांभाळली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community