शिक्षणमंत्र्यांकडून शिक्षकांची फसवणूक! लोकल प्रवासासंबंधीचे ‘ते’ ट्विट खोटे!  

आता शिक्षक अंतिम अस्त्र म्हणून दहावीच्या निकालाच्या कामावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दहावीचे निकाल नियोजित वेळेत लागण्याची शक्यता कमी झाली आहे. 

मुंबईत इयत्ता दहावीच्या निकालाचे काम करण्यासाठी शिक्षकांना लोकल प्रवासासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी राज्य सरकारकडे केली. वारंवार पत्र व्यवहार केला, अनेकदा मागणी केल्यावर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी १७ जून रोजी ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावीच्या निकालाचे काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासासाठी परवानगी दिली आहे’, असे ट्विटरद्वारे जाहीर केले, प्रत्यक्षात मात्र याला ४ दिवस उलटले, तरीही शिक्षकांना तिकीट घरातून माघारी पाठवले जात आहे. परिणामी शिक्षक विनातिकीट लोकलचा प्रवास करत आहेत.

७० टक्के शिक्षकांची कोंडी!

मुंबईतील शाळांमध्ये दहावीच्या निकालाचे काम करण्याची जबाबदारी एकूण १३ हजार ५०० शिक्षकांवर आहे, त्यातील ७० टक्के शिक्षक हे ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यांतून येतात. त्यांना शाळांमध्ये हजर रहायचे असेल, तर लोकल प्रवासाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे या शिक्षकांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबई विभाग आणि अन्य शिक्षक संघटनांनी राज्य शासनाकडे केली. त्यासाठी अनेकदा पत्र व्यवहार केला, शिक्षकांनी विना तिकीट लोकल प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन केले. तरीही सरकारने शिक्षकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. दुसरीकडे शालेय शिक्षण विभागाने १५ जूनपासून १०वीच्या निकालाचे काम करणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के केली, तसेच ३० जूनपर्यंत म्हणजे पुढील १५ दिवसांत निकाल तयार करण्याचे फर्मान काढले.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले ‘हे’ ट्विट!

शाळा सुरु होऊन ६ दिवस उलटले तरी सरकारने शिक्षकांच्या लोकल प्रवासावर निर्णय घेतला नाही. १७ जून रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत १० वीच्या निकालाचे काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी लोकल प्रवासाला परवानगी दिली आहे, असे सांगितले, त्यामुळे खुश झालेल्या शिक्षकांनी दुसऱ्या दिवशी लोकल प्रवासासाठी तिकीट काढण्याकरता तिकीट खिडकी गाठली मात्र तेव्हा त्यांना तिकीट नाकारले.

(हेही वाचा : दहावीच्या निकालासाठी शिक्षकांना लोकल प्रवासाला परवानगी, पण…!)

अखेर तिकीट खिडक्यांवर फलक लावले! 

सलग २-३ दिवस उपनगरीय रेल्वे स्थानकांत शिक्षक तिकिटासाठी रांगा लावू लागल्यावर आता काही उपनगरीय रेल्वे स्थानकांतील तिकीट खिडक्यांवर ‘शिक्षकांना लोकल प्रवासासाठी परवानगी नाही’ असे फलकच लिहिण्यात आले आहेत. अशा प्रकारे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांची फसवणूक केली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षक देऊ लागले आहेत.

निकालाच्या कामावर बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीत! 

एका बाजूला शिक्षकांना लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे, असे सांगायचे आणि दुसरीकडे रेल्वेला तसे पत्र पाठवायचे नाही अर्थात परवानगी द्यायची नाही, अशा प्रक्रारे सरकार शिक्षकांची फसवणूक करत आहे. त्यामुळे आता शिक्षक अंतिम अस्त्र म्हणून दहावीच्या निकालाच्या कामावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दहावीचे निकाल नियोजित वेळेत लागण्याची शक्यता कमी झाली आहे.

(हेही वाचा : शिक्षकांच्या लोकल प्रवासाच्या विषयावर शालेय शिक्षण विभाग ढिम्मच!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here