विद्यार्थ्यांमध्ये मूल्य शिक्षण रुजवण्यासाठी स्काऊट गाईडचे (Scout Guide) योगदान अतिशय मोलाचे मानले जाते. या विषयाबाबत आगामी काळात प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी राज्यपाल रमेश बैस (Governer Ramesh bais ) यांची भेट घेतली.
महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील सर्व शाळांतील मुलामुलींकरिता स्काऊट गाईड हा उपक्रम शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. प्राथमिक व माध्यमिक शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण रुजविण्याच्या उद्देशाने स्काऊट गाइड विषय शिकविण्यात येते. स्काऊट, गाईड उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर उत्तम संस्कार होऊन देशाच्या भावी नागरिकांचे व्यक्तिमत्त्व सुयोग्य प्रकारे विकसित होण्यास मदत होते. स्काऊट गाईड चळवळीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील सर्व शाळांमध्ये स्काऊट गाइड हा विषय अनिवार्य करण्यात येणार असल्याबाबत जाहीर केले आहे.
(हेही वाचा – Adulteration Of Milk : दुधात भेसळ करणाऱ्यांनो सावधान, प्रशासनाकडून धडक कारवाई)
त्याअनुषंगाने, राज्यस्तरीय स्काऊट गाईड मेळाव्याचे अमरावती येथे आयोजन करण्यात यावे व स्काऊट गाईड या विषयाची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याचा शुभारंभ आपण पालक म्हणून मेळाव्याच्या माध्यमातून करावी अशी विनंती खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे. स्काऊट गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव, सहकार्यवृत्ती,सर्वधर्मसमभाव, राष्ट्रभक्ती व विविध सांस्कृतिक परंपरेचे देवाणघेवाण अशी अनेक मूल्य प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थी आत्मसात करत असतात.
याच मूल्यांना जागतिक पातळीवरील लौकिक मिळावा यासाठी प्रयत्न होत असतात.अमरावतीला राष्ट्रभक्ती,राष्ट्रप्रेम इत्यादी विषयाची मोठी परंपरा लाभली असून अमरावती ही कर्मयोगी गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षणमहर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, पद्मश्री डॉ.शिवाजीराव पटवर्धन, प्रभाकरराव वैद्य यांची भूमी आहे. त्यामुळे हा मेळावा अमरावतीत होणे हे फार महत्त्वाची बाब असल्याचे डॉ.अनिल बोंडे यांनी राज्यपालांच्या लक्षात आणून दिले. त्यावर राज्यपाल रमेश बैस व सरकार दोन्ही सकारात्मक असल्याने आगामी काळात लवकरच राज्यपालांचा तसा कार्यक्रम ठरणार असल्याचे संकेत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या संदर्भात खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पत्र दिले आहे.
हेही पहा –