सध्या देशातील ४ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशात निवडणूक होत असून २ मे रोजी त्यांचा निकाल लागणार आहे. मात्र सध्या देशभर कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आले, अशावेळी निवडणूक आयोग काही दिशानिर्देश देणार आहे का, अन्यथा आम्ही मतमोजणीला स्थगिती आणू, असा इशारा मद्रास उच्च न्यायालयाने दिल्यावर अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाला जाग आली आणि निवडणूक आयोगाने निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणूक न काढण्याचे निर्देश दिले आहेत.
विजयी उमेदवारासोबत फक्त दोनच व्यक्ती असणार!
तसे प्रतिज्ञापत्र आयोगाने मंगळवारी, २७ एप्रिल रोजी मद्रास आणि कोलकत्ता या दोन्ही उच्च न्यायालयात सादर केले. २ मे रोजी आसाम, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल ही राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या पाचही ठिकाणी 2 मे रोजी निवडणुकीतील विजयोत्सव साजरा करणाऱ्या मिरवणुकीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच विजयी उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र घेताना त्याच्यासोबत २ पेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत, असेही आयोगाने म्हटले आहे.
(हेही वाचा : बीडमध्ये विदारक स्थिती! एका रुग्णवाहिकेत ‘इतके’ कोंबले मृतदेह!)
सर्वोच्च न्यायालयातही केंद्राचे प्रतिज्ञापत्र!
देशात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र ज्या काही उपाययोजना करत आहे, त्यावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नियंत्रण आहे. त्यांचाच नियंत्रणाखाली युद्धपातळीवर देशभरातील राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे, असे केंद्राने त्यांच्या १०६ पानांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. महाधिवक्ता तुषार मेहता यांनी तशी माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली. देशभरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने याची स्वतःहून दखल घेत याचिका दाखल करून घेतली. त्यावर केंद्राने प्रतिज्ञापत्र दाखल केले. केंद्र सरकारने औद्योगिक गॅस मॅन्युफॅक्चरला मेडिकल ऑक्सिजन निर्मितीचा परवाना दिला आहे. स्टील उद्योगालाही ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. औद्योगिक क्षेत्राला ऑक्सिजनचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, असेही या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community