मुंबई महापालिका निवडणूक : निवडणूक आयोगाची शिक्षकांवर कारवाईची नोटीस!

शिक्षकांनी पुढील ४८ तासांत मतदार नोंदणी कार्यालयात हजर व्हावे, अन्यथा लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम ३२(१) आणि मतदार नोंदणी १९६० (३२) नुसार शाळेचे कार्यालय प्रमुख आणि संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल, असे या नोटिशीत म्हटले आहे. 

144

मुंबई महापालिका निवडणुकीचे वेध लागताच निवडणूक आयोगाला मतदार याद्यांच्या कामाची आठवण झाली आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने नेहमीप्रमाणे शिक्षकांना या कामासाठी जुंपण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरता लागलीच  खासगी शाळांच्या शिक्षकांना या कामासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दहावीचा निकाल बनवायचा कि निवडणूक आयोगाचे काम करायचे, अशा द्विधा मनस्थितीत अडकलेल्या शिक्षकांनी अखेर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून निकालाच्या कामाला प्राधान्य दिले, त्या शिक्षकांना आता निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

१०वीच्या निकालाचे काम होत असताना त्यातील त्रुटी दूर कारण्याचेही काम महत्वाचे आहे. त्याकरता अजून काही दिवस लागणार आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांना नोटीस मिळाल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. मुंबई मनपा निवडणूकसाठी मतदार यादी बनवण्याकरता शिक्षकांना जुंपले जात आहे. मनपाकडे १ लाख कर्मचारी असतांना खासगी शाळेतील शिक्षकच का? अजून आँनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्याना हजर करून घेणे हे महत्वाचे काम प्रलंबित आहे. प्रवेश सुरू आहेत. सेतू अभ्यासही घ्यायचा आहे. असे असताना शिक्षकांना या कामासाठी का जुंपले जात आहे? हे काम मनपा कर्मचारी यांना घेऊन करावे. असे केल्याने आँनलाईन शिक्षणावर परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे!
– शिवनाथ दराडे, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबई विभाग.

शिक्षकांची झाली कोंडी!

शासनाच्या परिपत्रकानुसार शिक्षक दहावीच्या निकालाचे काम ११ जूनपासून करत आहेत. त्यांच्यासमोर ३० जूनपर्यंत १०वीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन करून निकाल करण्याचे काम पूर्ण करण्याचे आव्हान होते. एकतर यंदाची निकालाची पद्धत संपूर्ण वेगळी आहे, ती समजून घेऊन अधिकाधिक अचूक पद्धतीने निकालाचे काम करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर होते, त्यासाठी शिक्षकांना अधिक वेळ द्यावा लागत होता. अशा वेळी ते शिक्षक निवडणूक मतदार यादीच्या कामात सहभागी होऊ शकले नसल्याने त्यांच्यावर कारवाईचा आदेश निवडणूक आयोगाने काढला आहे.

(हेही वाचा : १२वीच्या १६ लाख विद्यार्थ्यांचा अवघ्या १७ दिवसांत निकाल तयार होणार!)

काय म्हटले आहे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी पत्रात? 

अंधेरी (पश्चिम) येथील मतदार नोंदणी अधिकारी यांनी जुहू येथील व्ही.पी. विद्यानिधी हायस्कुलला पत्र पाठवून तेथील के.एस. पाटकर आणि मोरेश्वर घाणेकर यांच्यासह ६ शिक्षकांना शैक्षणिक कामातून मुक्त करून त्यांना मतदार याद्यांच्या कामासाठी उपलब्ध करावे, असा आदेश वजा सूचना केली होती. मात्र त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने मतदार नोंदणी अधिकारी यांना ‘सध्या १०वीच्या निकालाचे काम सुरु असून या शिक्षकांची ‘बी.एल.ओ.’ म्हणून नियुक्ती रद्द करावी’, अशी विनंती केली. मात्र मतदार नोंदणी अधिकारी यांनी २२ जून रोजी शाळा व्यवस्थापनाला पत्र लिहून ‘या सहा शिक्षकांनी पुढील ४८ तासांत मतदार नोंदणी कार्यालयात हजर व्हावे, अन्यथा तुमच्यावर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम ३२(१) आणि मतदार नोंदणी १९६० (३२) नुसार शाळेचे कार्यालय प्रमुख आणि संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल, असे या नोटिशीत म्हटले आहे.

Feature Image

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.