स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे झालेल्या शिखर संमेलनात झालेल्या एका करारानुसार रत्नागिरीत विजेवरच्या वाहनांच्या निर्मितीचा कारखाना सुरू होणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रत्नागिरी औद्योगिक क्षेत्रात नव्या अतिथिगृहाचे बांधकाम आणि जुन्या अतिथिगृह इमारतीचे नूतनीकरण करण्याच्या कामांचे भूमिपूजन आज सामंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, अमेरिकेतील एका कंपनीशी याबाबतचा करार झाला असून पुढची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. रत्नागिरीतील औद्योगिक विकास आणि मूलभूत सुविधांसाठी ८८ कोटींची योजना असल्याचेही सामंत यांनी सांगितले. पालकमंत्री म्हणाले रत्नागिरीत येणाऱ्या मोठ्या उद्योजकांना तसेच येथील उद्योजकांना बैठक घेण्यासाठी सेव्हन स्टार विश्रामगृह पाहिजे, यासाठी राज्यातील सर्वांत सुंदर आणि सर्व सोयींनी सुसज्ज विश्रामगृह रत्नागिरीत उभारले जात आहे. जुन्या विश्रामगृहादेखील बरीच वर्षे झाली असल्याने त्याचेही नूतनीकरण करण्यात येत आहे. लोटे एमआयडीसीसाठी ७ कोटी, वॉटर सोर्स टाकीसाठी १२ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. उद्योजकांना, एमआयडीसीमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांना कोणतीही सुविधा अपुरी पडू नये, ही कामे करण्यात येत आहेत. रत्नागिरी एमआयडीसीमधील ८८ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून त्यांना कायम केल्याचे आदेश येत्या दोन दिवसांत येतील.
(हेही वाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकारण तापले; एकीकडे महाविकासची सभा दुसरीकडे भाजपाची सावरकर गौरव यात्रा)
उद्योगमंत्री म्हणाले, रत्नागिरी जिल्हयाच्या उद्योगजगताला ताकद देण्यासाठी ८८ कोटी निधी रुपये मंजूर केले. त्यामध्ये एमआयडीसीला जोडणाऱ्या शिरगाव, नाचणे, निवसर, निवळी, मिरजोळे, टिके या ग्रामपंचायतींतील रस्त्यांसाठी ३१ कोटी रुपये, तर एमआयडीसीसाठी आवश्यक इतर रस्त्यांसाठी १३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. लोटे एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग येत आहेत. शैक्षणिक क्षेत्राचा विचार करता अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. त्याची इमारत होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयही रत्नागिरीमध्ये होत आहे. यामुळे रत्नागिरीतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. रायगड जिल्ह्यात स्कील इंडस्ट्रीज होत आहे. त्याच्या रत्नागिरी उपकेंद्रालाही तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.
रत्नागिरी इंडस्ट्रीजला डी प्लसपेक्षा चांगल्या सोईसुविधा देण्यात येतील. उद्योजकांसाठी जे जे लागेल ते ते देण्याची हमी शासनातर्फे आम्ही देतो. परंतु उद्योजकांनीदेखील स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे. उद्योगवाढीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्यात येत आहेत. रत्नागिरी विमानतळाची धावपट्टी उत्कृष्ट आहे. वर्षभरात विमानतळ सुरू होईल. येत्या महिन्याभरात रत्नागिरीच्या विमानतळावर नाइट लँडिंग सुरू होत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चौथ्या अशियाई खो-खो स्पर्धेमध्ये भारताला विजेतेपद मिळविण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या रत्नागिरीच्या अपेक्षा सुतारचा विशेष सत्कार सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय खो-खो संघाचे प्रशिक्षक पंकज चंवडे यांचाही सत्कार करण्यात आला.
Join Our WhatsApp Community