- विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादर पश्चिम येथील केशवसुत उड्डाणपुलावरील तसेच खालील बाजूस असलेल्या रस्ते दिव्यांच्या जोडणीतून फेरीवाल्यांकडून विजेची चोरी (Electricity Theft) होत असल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर या विजेच्या जोडण्या कापण्यात आल्या. त्यामुळे केशवसुत उड्डाणपुलाखाली केवळ बेस्टच्या दिव्यांचा प्रकाश दिसून येत होता. परंतु महापालिकेच्या परवाना विभागाचा पदभार अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्याकडून काढून घेण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी डोके वर काढले असून या पुलाखाली काही सावकार मंडळींनी पुन्हा वीज चोरी करत विजेची जोडणी उपलब्ध करून दिल्यानंतर या गाळ्यांमध्ये फेरीवाल्यांच्या धंद्यांवर विजेच्या दिव्यांचा लखलखाट दिसून येत आहे.
दादर पश्चिम रेल्वे स्थानकाशेजारी सेनापती बापट मार्गावरुन जाणाऱ्या केशवसुत उड्डाणपुलाच्या खाली तब्बल २० गाळे असून चप्पल विक्रेत्यांसह घनकचरा व्यवस्थापन विभागाची चौकी वगळता अन्य सर्व गाळ्यांमध्ये फेरीवाल्यांनी अतिक्रमण करत जागा अडवल्या आहेत. या गाळ्यांमध्ये फेरीवाल्यांकडून व्यवसाय केला जात असून रात्रीच्या वेळी दिव्याची व्यवस्था प्रत्येक फेरीवाल्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी असते. मात्र, रात्रीच्या वेळी चोरीची लाईट (Electricity Theft) घेऊन विजेचा प्रकाश पाडणाऱ्या फेरीवाल्यांकडून आता दिवसाही मोठ्या मेगावॅट क्षमतेचे बल्ब तसेच हॅलोजन आणि पंख्याचा वापर केला जात आहे.
(हेही वाचा – National Teacher Award 2024 : महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार)
या पुलाखालील ९ ते १० गाळ्यांमध्ये ही विजेची चोरी (Electricity Theft) होत असून प्रत्येक फेरीवाले हॅलोजनसह मोठ्या वॅटचे बल्ब आणि पंख्याचा वापर सर्रास तिथे केला जात असल्याने याबाबत ‘हिंदुस्थान पोस्ट’ने छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केल्यानंतर याची दखल घेत अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार या सर्व विजेच्या जोडण्या कापण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा फेरीवाल्यांनी चोरीच्या विजेच्या जोडण्या घेण्याचा प्रयत्न केल्यांनतर पुन्हा बेस्ट आणि महापालिकेच्या वतीने संयुक्त कारवाई करून जोडण्या कापण्यात आल्या होत्या. मागील जून महिन्यांत या कारवाई केल्यानंतर तेव्हापासून केशवसुत उड्डाणपुलाखाली फेरीवाल्यांकडून होणारी वीज चोरी थांबली होती.
परंतु सोमवारी परवाना विभागाचा भार डॉ. अश्विनी जोशी यांच्याकडून काढून अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या वृत्तानंतर, दादरमधील फेरीवाल्यांनी पुन्हा डोके वर काढले असून केशवसुत उड्डाणपूलाखालील सर्व गाळ्यांसह रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी जागा अडवून ठाण मांडण्यास सुरुवात केली आहे. तसेच या फेरीवाल्यांनी पुन्हा गाळ्यांमध्ये व्यवसाय करता विजेच्या चोरीच्या जोडण्या घेऊन मोठ्या क्षमतेचे दिवे लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे गाळ्यांमध्ये फेरीवाल्यांनी ठाण मांडून बसतानाच विजेच्या जोडण्या घेत दिवे लावलेले असून या विजेच्या जोडण्या फेरीवाल्यांमधील सावकार मंडळींनी उपलब्ध करून दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या गाळ्यांमधील वीज चोरींच्या जोडण्यांवर ज्याप्रमाणे जोशी यांनी कारवाई केली होती ती धमक आता डॉ. विपीन शर्मा दाखवतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Electricity Theft)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community