सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन्सबाबत विरोधकांकडून आरोप होत असतानाच शनिवारी (१ जुलै) शिवसेना उबाठा गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनीही याबाबत भ्रष्ट्राचाराचा आरोप करत पाच हजार मशीन्स बसवणार कुठे असा सवाल केला होता. यावर मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्टीकरण देताना, सुरूवातीला केवळ २०० नग कॉम्बो मशीन्स शौचालयांमध्ये बसविण्याचे ठरविले आहे. या मशीन्स कार्यान्वित झाल्यानंतर मशीन्सचा वापर, कार्यक्षमता व प्रचालनाचा आढावा घेण्यात येईल व २०० नग कॉम्बो मशीन्सचा वापर, कार्यक्षमता व प्रचालनाचा आढावा घेवूनच उर्वरित ४ हजार ८०० नग मशीन्स बसविण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
मुंबई महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी रविवारी (२ जुलै) मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांच्या आरोपांचे खंडन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त पी वेलारासु, अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर, सहआयुक्त सुनील धामणे, चंद्रशेखर चौरे, विजय बालमवार उपायुक्त हर्षद काळे, उल्हास महाले आदी उपस्थित होते.
चहल म्हणाले, मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्था (NGO), लोकप्रतिनिधी, विचारवंत यांच्यासह विविध मान्यवरांनी सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन्स बसविण्याची मागणी केली. त्यामुळे ज्या प्रमाणे प्रसाधनगृहांमध्ये वीज आणि पाण्याची सुविधा दिली जाते, त्याप्रमाणेच सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन्स बसविण्याचा निर्णय घेतला होता. सद्या मुंबईत एकूण ८ हजार १७३ शौचालये आहेत. त्यामध्ये १ लाख शौचकुपे (सिट्स) आहेत. ८ हजार १७३ शौचालयांपैकी ५ हजार शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन्स बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(हेही वाचा – पायाभूत सुविधा आणि परदेशी गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर – मुख्यमंत्री)
या मशीन्स ६६ हजार किंमतीत खरेदी करण्यात येत आहे. काहींनी याबाबत तक्रारी करून या मशीन्स ४४ हजारात मिळत असल्याचे सांगितले.
बाजारात २३ हजार किंमतीच्या मशीन्स आहेत. पण त्यात फक्त सॅनिटरी नॅपकिन वेंडिंगची सुविधा असून त्यामध्ये इन्सिनरेटरचा समावेश नाही. परंतु महापालिका सार्वजनिक शौचालयांमध्ये बसवण्यासाठी ज्या मशीन्स घेण्यात येत आहेत त्या आयओटी आणि डेटा ऍनालिटिक्स आधारित “कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग – इन्सिनेरेटर मशीन्स आहेत.
शिवाय या सर्व मशीन्समध्ये नॅपकीनचा वेळोवेळी भरणा करण्यासाठी कंत्राटदाराला विभाग स्तरावर कर्मचा-यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्याकरिता लागणारे मनुष्यबळ, वाहन व्यवस्था व त्या अनुषंगाने होणारा सर्व खर्च कॉम्बो मशीनच्या या दरामध्ये अंतर्भूत आहे.
या कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग – इन्सिनेरेटर मशीन सार्वजनिक शौचालयांमधे बसविण्यात आल्या नंतर या मशीनचे होणारे संभाव्य नुकसान व चोरी शक्यता लक्षात घेवून आवश्यक विमा साठीचा खर्च कंत्राटदरामार्फत केला जाणार आहे. यासाठी आवश्यक असणारी विद्युत साधने व त्यांच्या जोडणीचा खर्च मशीनच्या किंमतीमध्ये समाविष्ट आहे. शिवाय या मशीन्समध्ये सॅनिटरी नॅपकिन संपल्यानंतर याचे अलर्ट त्यांच्या नियंत्रण कक्षाकडे जाईल आणि त्यानुसार संबंधित संस्थेचा माणूस येऊन त्या नॅपकिन मशीन्समध्ये भरून जाईल. यासाठी जो कंट्रोल रूम बनवायचा आहे, तो संबंधित संस्था बनवेल. जेणेकरून नॅपकिन संपले किंवा मशीन बिघडली तरीही तात्काळ दुरुस्त करण्याची व्यवस्था त्यांची असेल.
नॅपकीन इन्सिनरेटर मशीनमध्ये दुहेरी दहन कक्षाची व्यवस्था असून एका कक्षामध्ये दहन व दुसऱ्या कक्षामध्ये विषारी वायुवर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे कोणतेही विषारी वायू वातावरणात सोडले जात नाहीत.
महानगरपालिकेने सुरूवातीला केवळ २०० नग कॉम्बो मशीन्स शौचालयांमध्ये बसविण्याचे ठरविले आहे. सदर मशीन्स कार्यान्वित झाल्यानंतर मशीन्सचा वापर, कार्यक्षमता व प्रचालनाचा आढावा घेण्यात येईल व २०० नग कॉम्बो मशीन्सचा वापर, कार्यक्षमता व प्रचालनाचा आढावा घेवून उर्वरित ४ हजार ८०० नग मशीन्स बसविण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल,असे चहल यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community