महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नोकऱ्यांमधील खुल्या जागांवर विविध मागास घटकातील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमुळे ‘रोस्टर’ पूर्ण झाल्याने एसटीत यापुढे मराठा नोकरभरती बंदीचा धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः मराठवाड्यातील अनेक विभागांत गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. यामुळे मराठा समाजाची एसटी मधील संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, यापुढे खुल्या प्रवर्गातील ४८% जागांवर मराठा समाजाचे तरुण-तरुणी भरती झाले पाहिजेत. अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा क्रांती मोर्चा उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक विरेंद्र पवार यांनी घेतली आहे. या संदर्भात मराठा क्रांती मोर्चा व मराठा महासंघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
(हेही वाचाः आता एसटीचे चालक-वाहक ठरवू शकतात बसचे वेळापत्रक)
केवळ १२ टक्के जागा भरल्या
इतर शासकीय विभागातील नोकऱ्यांप्रमाणे एसटीमध्येही आरक्षण आहे. अनुसूचित जातींसाठी १३ टक्के, अनुसूचित जमाती ७ टक्के, विशेष मागासवर्ग २ टक्के, विमुक्त जाती व जमाती ११ टक्के, इतर मागासवर्ग १९ टक्के तर खुल्या वर्गासाठी ४८ टक्के आरक्षण आहे. सध्या महामंडळात ३३ हजार चालक, ३२ हजार वाहक, १९ हजार यांत्रिकी कर्मचारी असे एकूण ९७ हजार कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकारी आहेत. परंतु मराठा बांधवांसाठीच्या खुल्या वर्गातील ४८ टक्के जागांपैकी मराठवाडा विभागात आतापर्यंत केवळ १२ टक्के जागा भरल्या आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली.
एसटी प्रशासनाने केली सेटलमेंट
एसटीमध्ये २०१४-१५, २०१६-१७ व २०१८-१९ अशी तीन वेळा नोकरभरती झाली आहे. त्यामध्ये विशेषत: चालक आणि वाहकांचा समावेश होता. ही भरती प्रक्रिया सर्व जिल्ह्यांमध्ये असल्यामुळे मराठवाड्यातील अनेक उमेदवार मराठवाड्याबाहेरील जिल्ह्यांमधून भरती झाले होते. परंतु नोकरी लागल्यानंतर यामधील अनेक उमेदवारांनी आपल्या जिल्ह्यांमध्ये बदल्या करुन घेतल्या आहेत. रोस्टरप्रमाणे मराठवाड्यातही खुल्या वर्गांसाठी ४८ टक्के जागा राखीव आहेत. मात्र, या विभागात खुल्या वर्गाचे आतापर्यंत केवळ २० टक्के रोस्टर पूर्ण झाले आहे. वैयक्तिक व कौटुंबिक कारणे सांगून तसेच राजकीय नेत्यांच्या शिफारशी आणून मराठवाडा विभागात विविध मागास घटकातील कर्मचाऱ्यांनी बदल्या करुन घेतल्या आहेत. मागासवर्गीयांचे रोस्टर या आधीच पूर्ण झाल्यामुळे खुल्या वर्गासाठीच्या जागेवर त्यांची नेमणूक केली जाते. त्यात मागास घटकातील कर्मचाऱ्यांची ‘सेटलमेंट’ एसटी प्रशासनाने केली आहे.
(हेही वाचाः पडळकरांचा आता ‘युनियन मुक्त एसटी कर्मचारी’ नारा)
मराठा बांधवांचा मार्ग खडतर
सध्या मराठवाड्यातील खुल्या जागांचे रोस्टर अशा पद्धतीने पूर्ण झाल्यामुळे भविष्यात मराठा बांधवांसाठी एसटीच्या नोकरभरतीचा मार्ग खडतर झाला आहे, अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली. मराठवाड्यातील रोस्टरप्रमाणे खुल्या वर्गाचा कोटा अगोदरच विविध प्रवर्गातील कर्मचाऱ्यांनी भरला असल्यामुळे स्थानिक मराठा बांधवांना नोकर भरतीसाठी इतर जिल्ह्यात जावे लागत आहे. नोकर भरतीनंतर तेही पुन्हा इतरांप्रमाणे आपल्या जिल्ह्यात बदलीसाठी प्रयत्न करतात. पण रोस्टर अगोदरच पूर्ण झाल्यामुळे बदलीसाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. यातून गैरप्रकार सुद्धा घडत असल्याच्या तक्रारी मराठा क्रांती मोर्चा व मराठा महासंघाकडे आल्याची माहितीही पवार यांनी दिली.
मराठा मंत्र्यांचे दुर्लक्ष
राज्यात आतापर्यंत अनंतराव थोपटे, बाबासाहेब भोसले, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, मधुकर चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, शंकरराव कोल्हे, मधुकर चव्हाण हे मराठा समाजातील नेते परिवहन मंत्री झाले आहेत. पण त्यांनी बिंदूनामावलीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप मराठा क्रांती मोर्चा व मराठा महासंघाने केला आहे.
(हेही वाचाः विनातिकीट प्रवाशांविरोधात एसटीची तपासणी मोहीम)
रोस्टर सुधारा, अन्यथा आंदोलन
खुल्या वर्गातील जागांवर विविध मागास घटकातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व बदल्या करणे हा प्रशासकीय भ्रष्टाचार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब व राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, तसेच मराठा आरक्षण उप समितीचे प्रमुख व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत स्वतः लक्ष घालून एसटी मधील रोस्टर दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत. व यापुढे रोस्टर प्रमाणे बदल्या करण्यात याव्यात. अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचाः रडगाणे सुरुच… एसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी पुन्हा मिळणार ‘थांबा’?)
शिष्टमंडळात मराठा महासंघाचे मुंबई अध्यक्ष महेश सावंत, मराठा महासंघाच्या युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष दिलीप पाटील, मंदार जाधव, शंकर कोळसे -पाटील, दत्तात्रय पाटील, प्रकाश निपाणे आदी पदाधिकारी हजर होते.
Join Our WhatsApp Community