वसईतील तुंगारेश्वर अभयारण्यातील तब्बल २५ वर्षांहून जुन्या अतिक्रमणांवर बुधवारी अखेरीस वनविभागाने हातोडा उगारला. सुकाळपाडा आणि कोल्ही या भागांतील तब्बल २२ पक्की घरे वनविभागाने पोलिसांच्या मदतीने तोडली आहेत. तुंगारेश्वर अभयारण्यात गेल्या काही वर्षांत कित्येकदा तृणभक्षक प्राण्यांची शिकारीची प्रकरणे समोर आली होती. बंदुकीसह शिका-यांना वनविभागाने धडक कारवाईत पकडले होते.
वनाधिका-यांची माहिती
तब्बल सात तास ही कारवाई सुरु होती. सुकाळपाडा येथील १८ तर कोल्ही येथील ४ घरे तोडली गेली. २० पोलिस आणि ८० वनाधिका-यांची टीम सकाळी साडेदहा वाजता घटनास्थळी पोहोचली. घरातील सामान बाहेर काढायला वेळ लागल्याने सात तास कारवाई सुरु होती. दुपारी ४ वाजेपर्यंत कारवाई पार पडली. अतिक्रमणातून मुक्त झालेल्या जंगलपट्ट्यात पुन्हा माणसांकडून अतिक्रमण होऊ नये, म्हणून या जागेवर वनाधिका-यांकडून पहारा दिला जाईल, अशी माहिती दिली गेली.
Join Our WhatsApp Community