‘चकमक फेम’ दया नायक यांची उचलबांगडी!

मुंबईतील गुन्हेगारांवर वचक ठेवून गुंड टोळ्यांच्या नांगी ठेचणाऱ्या मुंबई पोलिस दलातील पाच अधिकाऱ्यांची याआधीच मुंबई बाहेर झालेल्या बदल्यांमुळे मुंबई पोलिस दलात एक पोकळी निर्माण झाली आहे.

103
राज्याच्या गृहविभागाने मुंबई पोलिस दलात नावाजलेल्या अधिकाऱ्यांच्या मुंबई बाहेर बदल्या करण्याचा धडाका लावला आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबई पोलिस दलातील ४ आणि ठाणे पोलिस दलातील १ असे पाच पोलिस निरीक्षकांच्या बदल्या मुंबई बाहेर केल्यानंतर गुरुवारी एटीएसच्या जुहू युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक चकमक फेम अधिकारी दया नायक यांची गोंदिया येथे बदली करण्यात आली आहे. मुंबईतील चांगल्या पोलिस अधिकाऱ्यांची बदली गावकुसाबाहेर होत असल्यामुळे मुंबई पोलिस दलात चर्चेला उधाण आले आहे.
मुंबई पोलिस दलातील पोलिस निरीक्षक सुधीर दळवी, नंदकुमार गोपाळे, सचिन कदम आणि केदारी पवार आणि ठाणे पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे या अधिकाऱ्यांच्या दोनच दिवसांपूर्वी बदलीचे आदेश गृहविभागाकडून जारी करण्यात आले आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणी विभागात दया नायक!

या पाठोपाठ गुरुवारी एटीएसच्या मुंबईतील जुहू युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक असलेले चकमक फेम दया नायक यांची बदली थेट गोंदिया जिल्ह्यात करण्यात आली आहे. गोंदिया पोलिस अधिक्षक विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी विभागात दया नायक यांची बदली दाखवण्यात आली आहे. दया नायक यांची काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलिस दलातून राज्य दहशतवाद विरोधी पथकात बदली करण्यात आली होती. एटीएसमध्ये काम करतांना दया नायक यांनी अमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर काही प्रमाणात नियंत्रण आणले होते.

पोलिस दलात उलटसुलट चर्चा!

मुंबईतील गुन्हेगारांवर वचक ठेवून गुंड टोळ्यांच्या नांगी ठेचणाऱ्या मुंबई पोलिस दलातील पाच अधिकाऱ्यांची मुंबई बाहेर झालेल्या बदल्यांमुळे मुंबई पोलिस दलात एक पोकळी निर्माण झाली आहे. वाझे प्रकरणानंतर या अधिकाऱ्यांना सर्वांत प्रथम गुन्हे शाखेतून दूर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची थेट मुंबईच्या बाहेर बदली केल्यामुळे पोलिस दलात चर्चा सुरू झाली आहे.

प्रदीप शर्मा यांचे सहकारी कोथमिरेंचीही बदली!

ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांची बदली करण्यात आली असून त्यांची गडचिरोली येथे करण्यात आली आहे. राजकुमार कोथमिरे हे चकमक फेम प्रदीप शर्मा यांच्या सोबत ठाणे खंडणी विरोधी पथकात होते. प्रदीप शर्मा यांच्या निवृत्तीनंतर खंडणी विरोधी पथकाचा कार्यभार राजकुमार कोथमिरे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. कोथमिरे यांनी ठाणे खंडणी विरोधी पथकाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर अनेक वादाला त्यांना सामोरे जावे लागले होते. तसेच त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी अर्ज देखील दाखल झाले होते. त्यामुळे ठाण्यातील वादग्रस्त अधिकारी ठरले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.