माहिम किल्ल्यावरील अतिक्रमण हटवले; झोपडीधारकांना विशेष प्रकल्पातंर्गत पर्यायी निवास व्यवस्था

185

महाराष्ट्रातील विविध किल्ले अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असून यावरील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे यासाठी दुर्गप्रेमींकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, १९७२ मध्ये, प्राचीन स्मारके, पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम, १९६० अन्वये जेव्हा माहिमचा किल्ला महाराष्ट्र अंतर्गत राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला तेव्हा सीमाशुल्क विभागाने या गडावरील विद्यमान सुरक्षा काढून टाकली. यामुळेच मुंबईतील माहिम किल्ल्यावर संपूर्णपणे अतिक्रमण झाले. याठिकाणी झोपड्या बांधण्यात आल्या तसेच येथे राहणारे रहिवासी अनेक सेवांचा वापर करतात, जसे विद्युत, पिण्याचे पाणी, मल: निसारण, इत्यादी यामुळे किल्ल्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने माहिम किल्ल्याचा जीर्णोधार प्रकल्प हाती घेतला आणि माहिम किल्ला भागातील अतिक्रमण हटवण्यात आले.

( हेही वाचा : स्वातंत्र्यदिनापर्यंत देशभरात १ हजार ‘खेलो इंडिया’ केंद्रे सुरू करणार! )

किल्ल्याचा समुद्राच्या बाजूचा भाग अत्यंत खराब अवस्थेत असून दृश्य पाहणी केल्यास किल्ला अत्यंत जीर्ण झालेला दिसतो. त्यामुळे तेथे राहणे रहिवाशांसाठी अत्यंत जोखमीचे होते. किल्ल्याचा काही भाग किंवा पूर्णपणे किल्ला कोसळल्यास मोठ्या संख्येने जीवितहानी होऊ शकते कारण या किल्ल्यावर २६७ झोपड्या आणि अंदाजे ३००० रहिवासी राहत होते. त्यामुळे मानवतेच्या आधारावर आणि कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी माहिम किल्ला रिकामा करणे आणि पात्र झोपडीधारकांना विशेष प्रकल्प मानून त्यांना पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक होते म्हणूनच महापालिकेच्या जी उत्तर विभागामार्फत ही कारवाई करण्यात आलेली आहे.

प्रकल्पाची सुरुवातः –

  • सर्व प्रथम सदर प्रकल्प विशेष प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले.
  • माहिम किल्ल्यावरील झोपड्यांचा सर्व्हे करण्यात येत आहे. तेथील झोपडीधारकांना नोटीस देण्यात आल्या व त्यांच्या झोपड्यांचे पुरावे / कागदपत्रे मागविण्यात आले व त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रचलित धोरणांनुसार सदर झोपडीधारकांची पात्रता निश्चित करून त्यांना परिशिष्ट ०२ तयार करण्यात आले. यानुसार एकूण २६७ पैकी २६३ झोपडीधारक पात्र ठरविण्यात आले. सदर झोपडीधारकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन व्हावे म्हणून बैठक घेण्यात आली.
  • त्याबरोबरच, सदर किल्ल्यावरील झोपड्यांचे पुनर्वसन योग्य ठिकाणी करावायचे असल्याने, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांनी मालाड येथील साईराज गुराईपाडा येथे चालू असलेल्या पुनर्वसन प्रकल्पात बांधण्यात आलेली संक्रमण शिबीर इमारतीमधील १७५ सदनिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी भंडारी मेटलर्जी येथील पुनर्वसन प्रकल्पाकरिता बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये ७७ सदनिका या विभागास हस्तांतरित केल्या. तसेच, मालवणी येथील रॉयल फिंच इमारतीमधील ११ सदनिका देखील सहाय्यक आयुक्त, पी / उत्तर विभाग यांच्याकडून प्राप्त करण्यात आल्या आहेत. पात्र बाधित झोपडीधारकांसाठी सोडत आयोजित करण्यात आली व सोडतीद्वारे निश्चित करण्यात आलेल्या सदनिकांचे टप्या-टप्याने वाटप करण्यात आले.
  • काही झोपडीधारक त्यांना प्राप्त झालेल्या सदनिका घेत नसून, तिथेच वास्तव्य करीत असल्याने संपूर्ण प्रकल्प बाधित व प्रलंबित होत असल्याने, या विभागातील अधिकाऱ्यांनी पोलीस बळाच्या आधारे कार्यवाही केली व सदर कार्यवाही दरम्यान काही झोपडीधारकांविरूद्ध नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. दिनांक १७ मार्च २०२३ रोजी किल्ल्याजवळील संपूर्ण अतिक्रमण हटवण्यात आले आहे. माहीम किल्ल्याची दुरुस्ती करून सदर किल्ला पर्यटन स्थळ म्हणून खुला करण्यासाठी पुरातन सल्लागार विकास दिलावरी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या कारवाईमध्ये मार्गदर्शक म्हणून सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे तसेच, उपआयुक्त (परि-०२) रमाकांत बिरादार, अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा व महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सी. चहल यांचा सहभाग होता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.