अनिल देशमुखांची ईडीकडून चौकशी! मुलांच्या कंपन्याही रडारवर! 

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने आता ईडीने तपास सुरु केला आहे.

113

१०० कोटींच्या वसुली प्रकरणी अडकलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आधीच सीबीआयने देशमुखांची चौकशी सुरु केली असताना आता ईडीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ईडीने देशमुख यांच्या विरोधात  ईसीआयर अर्थात  तपास सुरु करण्यापूर्वी नोंदवलेले पहिले अधिकृत दस्तऐवज म्हणजेच एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट दाखल केला आहे. तसेच ईडी देशमुखांच्या दोन्ही मुलांच्या नावाने ज्या कंपन्या आहेत त्यांचीही चौकशी करणार आहे.

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने आता ईडीने तपास सुरु केला आहे. दरम्यान ईडी मनी लॉन्डरिंग प्रकरणी देशमुख यांची चौकशी करणार असून यात आता त्यांच्या दोन्ही मुलांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा : खलिस्तानींचे आता ‘कोविड’ बनले नवे शस्त्र! )

मुलांच्या या कंपन्यांची होणार चौकशी! 

  • सीबीआयकडून रडारवर असलेल्या देशमुखांच्या दोन्ही मुलांच्या कंपनीचीही चौकशी ईडीकडून होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
  • अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांचे शेअर्स असलेली झोडियाक डेलकॉम या कंपनीची चौकशी होण्याची शक्यता आहे.
  • झोडियाक डेलकॉम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोलकात्याची असून 2019 साली ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांनी ती विकत घेतली होती.
  • देशमुख यांची मुले चालवत असलेल्या अयती जेम्स, काँक्रीट रियल इस्टेट, अटलांटिक विस्टा रियल इस्टेट आणि काँक्रीट इंटरप्राजेस या कंपन्यांच्या माध्यमातून 2019 साली झोडियाक डेलकॉम कंपनी विकत घेण्यात आली होती.
  • झोडियाक डेलकॉम कंपनीचे व्यवहार याआधी सीबीआयने पडताळले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, आता पुन्हा एकदा ईडीकडूनही त्याची तपासणी होऊ शकते.

काय आहे प्रकरण?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे याला दर महा 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. याची चौकशी सीबीआय करू शकते का, त्यासाठीची प्राथमिक तपासणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायाने दिल्यानंतर सीबीआयने प्राथमिक चौकशी केल्यानंतर देशमुख यांच्याविरोधात थेट गुन्हाच दाखल केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.