जागतिक हृदय दिनीच महापालिकेच्या वरळी हबमध्ये अभियंत्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

215

मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाचे दुय्यम अभियंता अभिजित मोरे यांचा गुरुवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वरळी हब येथे रस्ते विभागाच्या बैठकीकरता आले असताना मोरे हे चक्कर येवून खाली कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. मोरे हे ३७ वर्षांचे होते. मोरे यांच्या मृत्यूनंतर वरळी हबमधील कर्मचाऱ्यांकरता दवाखान्याची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून हबमध्ये दवाखान्याची सुविधा असती तरी तातडीने त्यांच्यावर प्राथमिक उपचार होऊ शकले असते, असे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

अभियंता अभिजित मोरे चक्कर येऊन कोसळले

२९ सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन साजरा केला जात असून हृदय विकाराच्या आजारांसंदर्भात जनजागृती करून कशाप्रकारे रुग्णांचा जीव वाचवला गेला पाहिजे याचे प्रशिक्षण या माध्यमातून गुरुवारी अनेक कर्मचाऱ्यांना देण्यात आले. मात्र, या हृदय दिनाच्या दिवशीच महापालिकेच्या वरळी हबमध्ये पश्चिम उपनगरांमधील रस्ते विभागाचे दुय्यम अभियंता अभिजित मोरे हे आपल्या वरिष्ठांसह बैठकीसाठी आले असता अचानक चक्कर येवून खाली कोसळले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तिथे त्यांना मृत घोषित केले.

(हेही वाचा पीएफआयनंतर रझा अकादमी ही दुसरी दहशतवादी संघटना बाकी – नितेश राणे)

वरळी हबमध्ये दवाखाना देण्याची मागणी 

वरळी अभियांत्रिकी हब येथे सर्व अभियांत्रिकी विभागांची कार्यालये असून तिथे दवाखाना उपलब्ध करून देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. २० जून २०२२ रोजी अतिरिक्त आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीतही अभियंत्यांनी दवाखाना याठिकाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. महापालिका मुख्यालयात दवाखान्यांची सुविधा आहे, तसेच झोपडपट्टीतही एचबीटी क्लिनिक उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे वरळी हबमध्ये दवाखाना देण्याची मागणी मान्य करूनही आजतागायत याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. अभिजित मोरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना तातडीने प्राथमिक उपचार केले असते तर त्यांचा प्राण वाचवू शकलो असतो, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया कर्मचारी व्यक्त करत असून याठिकाणी तातडीने दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून दिली जावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.