गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता आणि प्रसूतिगृहातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील संवाद अधिक उत्तम व्हावा म्हणून महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. प्रसूतिगृहात येणाऱ्या रूग्णांसोबत अधिक सौजन्य आणि समाधानपूर्वक संवादाचा भाग म्हणून अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला ‘सॉफ्ट स्किल’चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि टाटा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुढाकार घेण्यात आला आहे.
टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस – TISS) या संस्थेद्वारे ‘वर्तन बदल संवाद ‘ प्रशिक्षणाचे पहिले सत्र नुकतेच घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा एकूण ४२ कर्मचा-यांनी लाभ घेतला आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्व प्रसूतिगृहांमध्ये मिळून अश्या प्रकारचे एकूण ५८ प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार आहेत.
मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व प्रसूतिगृहांमध्ये अशाप्रकारचे कार्यशाळा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्या सुचनेनुसार आणि टाटा सामाजिक विज्ञान (TISS) संस्थेने या प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे.
(हेही वाचा Maharashtra Government : सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वयासाठी 12 सदस्यीय समिती)
सार्वजनिक आरोग्य सुविधांचा लाभ घेणा-या लाभार्थ्यांसाठी आरोग्य कर्मचारी हा संपर्काचे पहिला घटक आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी विश्वास आणि संबंध निर्माण करण्यासाठी आरोग्य कर्मचा-यांची पहिली छाप अत्यंत महत्त्वाची आहे. आघाडीच्या आरोग्य कर्मचार्यांमध्ये सहानुभूतीपूर्ण आणि सर्वसमावेशक वृत्ती सुनिश्चित करण्यासाठी कर्मचार्यांचे ‘सॉफ्ट स्किल्स’ विकसित करण्याची सतत गरज असल्याने सातत्याने समोर आले आहे.
महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत एकूण ३० प्रसूतिगृहे आहेत व वर्षाला साधारणत: १७ हजार प्रसूती होतात, ८ हजार ६०० शस्त्रक्रिया, ५ लाख २८ हजार बाह्यरुग्ण तपासणी होतात. प्रसूतिगृहांमध्ये एकूण कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या अंदाजे १ हजार ८०० आहे. प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी, रुग्णांशी सुसंवाद साधण्यासाठी संवाद कौशल्य कार्यशाळा महत्त्वाची ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community