राज्यभर आंदोलन, नेत्यांना लक्ष्य
दरम्यान आक्रमक मराठा समाजाने राज्यभर आंदोलने सुरु केली असून, ही आंदोलने आता नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचली आहेत. औरंगाबादमध्ये तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशार मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातही मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. पुण्या-मुंबईकडे जाणारा दूध पुरवठा आंदोलक रोखणार आहेत. गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव कार्यालयाबाहेर टॅंकर अडवणार आहेत. गोकुळमधून रोज पुण्यासाठी १५ टँकर, तर मुंबईसाठी ३५ टँकर दूधपुरवठा होतो. हा सर्व दूध पुरवठा रोखण्याचा प्रयत्न आंदोलक करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ संघ कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे, नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्याजवळ मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला.
आगीत तेल कोण ओततंय?
एकीकडे मराठा समाज आक्रमक असताना भाजपा नेते देखील सरकारवर टीका करताना पहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी देखील दंड थोपटले असून, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उदासीनतेमुळे मराठा समाजाला आरक्षणाला मुकावे लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता. मी शिवसैनिक आहे त्यामुळे मला माहित आहे,’ अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. जी पावले सरकार आता टाकत आहे. तशा बैठका सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वा उद्धव ठाकरेंनी का नाही घेतल्या?, असा सवाल देखील माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.
पोलीस भरतीमुळे मराठा समाज नाराज
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मराठा आरक्षणावर स्थगिती आणताच राज्य सरकारने पोलीस भरती काढल्यामुळे देखील मराठा समाज नाराज झाला असून, भाजपा नेत्यांनी राज्य सरकावर टीका करायला सुरुवात केली आहे. राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती झाली आहे. मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर ही मेगा भरती का करण्यात आली असा सवाल भाजप नेते नितेश राणे यांनी उपस्थित केला आहेत. इतकंच नाही तर हा आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची जळजळीत टीका नितेश राणे यांनी केली आहे. तसेच छत्रपती संभाजी राजेंनी देखी सरकावर टीका केली असून, सरकारने पोलीस भरतीचा जो निर्णय घेतला तो मुर्खपणाचा असल्याचे संभाजी राजे म्हणालेत.
ठाकरे सरकारला आठवले फडणवीस
स्थगितीमुळे मराठा समाज आक्रमक झाला असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आठवल्याचे पहायला मिळत आहे. मराठा समाज आक्रमक होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील बोलावण्यात आले होते. मात्र आवश्यकता होती तेव्हा बोलावले नाही याची खंत असल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला सहकार्य करण्याची आमची भावना आहे. राज्य सरकारला आमचा पाठिंबा आहे. आम्हाला याची खंत आहे की, आवश्यकता होती तेव्हा बोलावलं नाही, पण आताही आम्ही सरकरला सहकार्य करण्यात तयार आहोत, असे सांगून महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. मराठा आंदोलन हिंसक होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. महाराष्ट्र शांत कसा राहील, याचे भान ठेवा, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.